ठाणे जिल्हा परिषद शाळा pudhari news network
ठाणे

ठाणे : जिल्हा परिषदेच्या नर्सरी वर्गांसाठी सरकारकडे निधी नाही?

पुढारी वृत्तसेवा
मुरबाड शहर : किशोर गायकवाड

जिल्हा परिषद शाळांतील सातत्याने घटत्या विद्यार्थी संख्येवर प्रभावी पर्याय काढण्यासाठी प्रायोगिक तत्वावर तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कपिल पाटील व उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या प्रयत्नांतून सन 2010 साली इंग्रजी नर्सरी वर्ग सुरू करण्यात आले होते. नियुक्त शिक्षकांच्या मेहनतीवर विश्वास ठेवून पालक वर्गाने खासगी शाळेतून विद्यार्थ्यांची सोडचिठ्ठी करून जिल्हा परिषदेच्या या नवीन नर्सरी वर्गांना पसंती दिली आणि अल्पावधीतच जिल्हा परिषद शाळेंच्या पटसंख्येचे गत वैभव दुप्पटी प्राप्त झाले. त्यामुळे हा शैक्षणिक प्रयोग यशस्वी ठरून एकेकाळी ऐकू येणारा जिल्हा परिषद शाळा वाचवा या नार्‍याला कालांतराने पूर्णविराम लागला आहे.

बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व नव्याने उभारण्यासाठी गेली पंधरा वर्षे या नर्सरी वर्गांनी सुवर्ण भूमिका बजावली आहे. परंतु, आजची परिस्थिती पाहता सद्यस्थितीत जिल्हा परिषद शाळेची लाइफलाइन असलेल्या या नर्सरी वर्गाकडे सरकारने पाठ फिरवली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी सुरू झालेल्या या शाळा आता बंद झाल्या आहेत. याला केवळ सरकारचा कामसाधूपणा आणि उदासीन धोरण जबाबदार असल्याचे बोलले जाते.

आशिया खंडातील ठाणे जिल्हात प्रथम सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात दोन वर्ग अशा जिल्हाभरात 24 शाळेंमध्ये हा शैक्षणिक प्रयोग राबविण्यात आला होता. पुढे ठाणे-पालघर फाळणी होऊन जिल्हा परिषदेच्या निम्या शाळा पालघर जिल्हामध्ये गेल्या. त्यावेळी जिल्हा परिषदेने आपल्या सेस फंडातून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. मात्र सन 2019 पासून जि. प. कडून या वर्गांची ग्रँट बंद करण्यात आल्याने सद्यस्थितीला बहुतेक ठिकाणी या शाळा बंद करण्यात आल्या असून काही ठिकाणी केवळ लोकसहभागातून सुरू आहेत. त्यापैकी मुरबाड तालुक्यातील सरळगाव व मुरबाड शहरातील जिल्हा परिषद शाळा क्र. 2 येथील पटसंख्या कौतुकास्पद म्हणावी लागेल. तर या वर्गांना कागदोपत्री शासन दरबारी कायमचे स्थान देण्यात यावे, यासाठी अनेक वर्षांपासून मंत्रालयात प्रकरण प्रस्तावित आहे. मात्र मंत्रालयातून मंजुरी नसल्याने लेखा परीक्षण अहवालात ताशेरे ओढले जात आहे.

शिक्षकांचे भविष्य अंधारमय

तुटपुंज्या अनियमित मानधनावर या नर्सरी वर्गांसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांना पाच हजार रुपयांमध्ये सुरुवातीची सुमारे 9 वर्षे राबवून घेतले. या मानधनात शिक्षकांचा प्रवास खर्च ही सुटला नाही. मात्र सन 2019 नंतर ते ही बंद केले. त्यामुळे या शिक्षकांच्या भवितव्याची भरपाई न होणारे नुकसान झाले आहे. हे वर्ग टिकविण्यासाठी वर्षानुवर्षे या शिक्षकांनी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे हेलपाटे मारले. किंतु, त्यांच्या पदरी नैराश्या व्यतिरिक्त काहीही पडले नाही. मुलाखतीमध्ये कसोटीवर घासून निवडण्यात आलेले हे शिक्षक उच्च शिक्षित असून त्यांचा शिक्षणाचे फलित होत नसल्याने या नर्सरी वर्गावर काम करणार्‍या शिक्षकांचे भविष्य अंधारमय झालेले दिसून येत आहे.

चिंतातुर पालकवर्ग

मुरबाड शहरातील खासगी शाळेचे रेटकार्ड पहाता पालकांना भरगच्च फी आकारून देखील प्रत्येक गोष्टीला विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी केली जात असते. शिक्षण विभागातील हप्तेखोरीमुळे पालकांच्या यासंदर्भातील तक्रारींना केराची टोफली दाखवली जात असल्याचा आरोप होत आहे. मात्र प्रायोगिक तत्वावरील या शाळेंमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणा सोबत अनावश्यक शैक्षणिक खर्चाच्या व्यापापासून देखील सुटका होते. शिवाय बाल्यावस्थेतच पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नर्सरी शिक्षक विशेष मेहनत घेत असल्याने विध्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याचे पालकांना अनुभवात पडत आहेत. त्यामुळे पालकांचा या नर्सरी वर्गांना प्रतिसाद चांगला आहे.

सर्वाधिक पटसंख्येचा मान

नर्सरी वर्ग सुरू होण्यापूर्वी मुरबाड शहरातील जिल्हा परिषद शाळा क्र. 2 च्या इयत्ता पहिलीच्या वर्गात केवळ 20 विद्यार्थिनी होत्या. तद्नंतर त्यात दुप्पटी-टिप्पटीने वाढ झाली. त्यामुळे सर्वाधिक पटसंख्येसाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून दोन वेळा या शाळेला सन्मानित करण्यात आले. यात नर्सरी वर्गाचा सिंहाचा वाटा गणला गेला. सन 2018 मध्ये या वर्गातचक्क 207 पटसंख्या होती. त्यामुळे नर्सरी, ज्युनिअर के. जी. व सिनियर के. जी. यांच्या प्रत्येकी दोन तुकड्या पाडण्यात आल्याने या शैक्षणिक प्रयोगाचे संपादित यश समोर आले आहे. आजही या वर्गांची पटसंख्या सव्वाशे पार असल्याने जिल्हा परिषद शाळेंतील लोप पावलेली विद्यार्थी पटसंख्या वाढण्यासाठी हा उपक्रम नाविन्यपूर्ण ठरला आहे. यासाठी आवश्यक असणार्‍या शिक्षकांची संख्या अपुरी असतांना ही कामाचा अधिकतम भार स्वीकारून उपलब्ध नर्सरी शिक्षकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT