डोंबिवली : डोंबिवलीजवळच्या 27 गावांत चालणारा गॅस सिलिंडरच्या काळा बाजाराचा क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने पर्दाफाश केला आहे. ग्रामीण भागातील खोणी गावच्या हद्दीत काळ्या बाजाराचा अड्डा चालविणार्या दावडी गावातील एका आरोपीला क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने अटक केली आहे. राज मोती यादव (44) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो डोंबिवलीजवळच्या दावडी गावातील तुकाराम चौकात ाहतो. त्याच्याकडून 213 गॅस सिलिंडर्ससह 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दावडी गावात राहणार्या बदमाशाने काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या खोणी गावाजवळील तळोजा एमआयडीसी रोडला असलेल्या पायर्याचा पाड्यात अड्डा जमवला होता. हा घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस यंंत्राच्या साह्याने वाणिज्य वापराच्या सिलिंडरमध्ये भरून अशा सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सर्जेराव पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी मानपाडा पोलीस, तसेच अन्न आणि शिधावाटप विभागाच्या अधिकार्यांनी पायर्याचा पाड्यात असलेल्या अड्ड्यावर गुरुवारी संध्याकाळी धाड टाकली. या कारवाईत राज यादव हा गॅस सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याचे उघडकीला आणले.
राज यादव याच्या पायर्याचा पाड्यातील अड्ड्यावर केलेल्या कारवाई दरम्यान तेथे एका टेम्पोमध्ये घरगुती वापरातील 126 गॅस सिलिंडर होते. घरगुती वापरातील सिलिंडरना यंत्र लाऊन मोजमाप मीटरद्वारे त्यातील गॅस वाणिज्य वापराच्या सिलिंडरमध्ये भरला जात असल्याचे आढळून आले.
एका गॅस कंपनीचे 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचे 63 सिलिंडर, दुसर्या कंपनीचे जवळपास 150 हून अधिक सिलिंडर, गॅस भरणा करण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री टेम्पो असा एकूण 14 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत शिधावाटप निरीक्षक यांचाही सहभाग होता. या प्रकरणी क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील तपास करत आहेत.
काळा बाजारातील सिलिंडरची बेकायदा साठवणूक आणि वाहतूक करताना राज यादव याच्याकडे एकूण 13 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. स्थानिक रहिवाशांना या अड्ड्यावर चालणार्या गोरखधंद्याची यत्किंचितही भणक नव्हती. एका सिलिंडरमधून दुसर्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्याच्या प्रक्रिये दरम्यान इलेक्ट्रिक स्पार्क वा आगीशी संपर्क आला असता तर संपूर्ण परिसर बेचिराख झाला असता. मात्र क्राईम ब्रँचने वेळीच कारवाई केल्याने भविष्यात उद्भवणारा मोठा अनर्थ टळला आहे.