ठाणे : गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात स्वतः महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करून ९० दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ९० दिवसांपेक्षा अधिक कालावधी जाऊनही नूतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून आता १५ मे पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी (दि.7) पालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. नूतनीकरणामध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टी करण्यात आल्या आहेत याची माहिती त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडून घेतली. तर नाट्यकर्मी आणि रसिकांना हवे अशा प्रकारचे गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करण्यात आले असून या नूतनीकरनंतर नाट्य चळवळीला बळ मिळेल असे प्रतिपादन खासदार नरेश म्हस्के यांनी केले.
भुतकाळात गेले तर... "तुम्ही मला सत्ता द्या, मी तुम्हाला नाट्यगृह देतो" अशी घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या एका जाहीर सभेत केली होती. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर ठाण्यात पहिले भव्य नाट्यगृह उभे राहिले ते म्हणजे राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह. अनेक वर्षांची नाट्य परंपरा असलेल्या या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही.स्वतः महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी करून पुढच्या ९० दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश होते. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. मंगळवारी (दि.7) शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष नाट्यगृहाच्या ठिकाणी जाऊन नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी नाट्य दिग्दर्शक विजू माने, नाट्य निर्माते प्रसाद कांबळी आणि अन्य कलाकार उपस्थित होते. खा. म्हस्के यांनी जवळपास दोन तास कामाची पाहणी करून पालिका अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली. तर काही सूचना देखील त्यांनी यावेळी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलते ठाणे ही संकल्पना मनावर घेतली आहे. त्यादृष्टीने ठाणे आता पूर्णपणे बदलत आहे. केवळ ठाण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गडकरी रंगायतन या नाट्यगृहाला महत्व आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कामावर लक्ष ठेऊन असल्याचे नरेश म्हस्के त्यांनी सांगितले. मे मध्ये हे नाट्यगृह सुरु होणार असून नाट्यकर्मीना आणि रसिकांना जसे हवे तसे या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरु असून यामुळे नाट्य चळवळीला बळ मिळेल असे प्रतिपादन यावेळी खा.म्हस्के यांनी केले.तर ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजू माने यांनी नूतनीकरणाच्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. या नूतनीकरणाचे काम करत असताना नाट्यसंस्थांना आणि कलाकारांना नेमके काय हवे आहे याचा विचार करण्यात आला आहे. ही वास्तू अद्ययावत करण्यात येत असल्याने याचा आम्हाला अभिमान असल्याचे दिग्दर्शक विजू माने यावेळी म्हणाले.