ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘असेन मी... नसेन मी...’ या नाटकाच्या तिकिटाच्या पहिल्या दोन-तीन रांगा तिकीट खिडकी उघडण्यापूर्वीच ‘बूक’ होण्याचा धक्कादायक प्रकार घडला.
या प्रकाराची काही नाट्यरसिकांनी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली. नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, अशी मागणी आता नाट्यरसिकांकडून केली जात आहे.
ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे, हिरानंदानी मिडोज येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मराठी नाटकांचे प्रयोग होत आहेत. नाट्यगृहाच्या नियमानुसार, प्रयोगाच्या चार दिवस आधी नाट्यगृहातील पहिल्या पाच रांगांची तिकीट विक्री सुरू होते. तर मागील रांगांमधील तिकिटे फोन बुकींग व ऑनलाईन पद्धतीने विक्री केली जातात.
त्यानुसार 30 एप्रिल रोजी होणार्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ व 1 मे रोजी होणार्या ‘असेन मी... नसेन मी...’ नाटकाची तिकिटे काढण्यासाठी पाचपाखाडीतून काही नाट्यरसिक पुढील रांगेतील तिकिटे मिळविण्यासाठी सकाळी साडेसात नंतर पोहोचले. सकाळी 8.30 वाजता दोन्ही नाटकाच्या बुकिंगसाठी खिडकी उघडल्यावर पहिली ते चौथीपर्यंतच्या रांगेतील मध्यवर्ती ठिकाणची तिकिटे बूक झाली असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही नाटकांच्या बुकिंग खिडकीवर अशीच स्थिती होती. त्यावेळी काही रसिकांनी विचारणा केल्यावर, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ची तिकिटे दामलेंनी गेस्टसाठी ठेवली असल्याचे सांगण्यात आले. तर ‘असेन मी... नसेन मी...’ प्रयोगाची पहिल्या दोन-तीन रांगांतील तिकिटे फोन बुकिंगवर बूक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रत्यक्षात नियमानुसार, फोन बुकिंगच्या माध्यमातून सहाव्या रांगेतील तिकिटे बूक केली जात असल्याचे समजते.
या प्रकाराबाबत काही नाट्यरसिकांनी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांच्याकडे तक्रार केली. महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात तिकीट बुकिंगसाठी निश्चित नियमावली करण्याची गरज आहे. कामातून विरंगुळा म्हणून वेळ काढणार्या सामान्य नाट्य रसिकालाही त्याच्या पसंतीच्या रांगेत नाटक पाहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी. तसेच नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, अशी मागणी केली. या प्रकारासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सोमवारी निवेदन दिले जाईल, असे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी सांगितले.