Thane News Pudhari
ठाणे

Fire Department Recruitment: गावदेवी दुर्घटनेनंतर सुस्त प्रशासनाच्या भरतीच्या हालचाली; 3 महिन्यात अग्निशमन विभागातील ६०१ पदे भरणार

ठाणे महापालिका आयुक्तांची सभागृहात माहिती; पालिकेच्या वास्तूंचेही होणार फायर ऑडिट

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: गावदेवी मंडईतील भीषण आगीत दोन अग्निशमन जवानांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेतील मनुष्यबळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या महासभेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अग्निशमन दलासह अभियांत्रिकी विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबविण्याची घोषणा केली. याशिवाय सरकारी आस्थापनांचे तातडीने फायर ऑडिट केले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

घटनेची माहिती देताना अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी आग कशी लागली, त्याची दाहकता आणि ती कीती वेळाने विझविली गेली, त्यात किती जणांचे प्राण गेले याची विस्तृत माहिती सभागृहाला दिली. तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. सदस्यांनी केलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे, असे सांगत त्यांनी अग्निशमन विभागातील मनुष्यबळाच्या स्थितीची माहिती दिली.

अग्निशमन विभागात ८३५ पदे मंजूर असली तरी सध्या केवळ ३२५ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ही तफावत भरून काढण्यासाठी ६०१ पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अग्निशमन जवानांना नियमित प्रशिक्षण, मॉक ड्रिल आणि आधुनिक उपकरणांची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दुर्घटनेत शहीद झालेल्या दोन जवानांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू असून शहरात नवीन फायर स्टेशन उभारणे, अग्निशमन वाहनांची संख्या वाढविणे आणि विभागाला अधिक सक्षम बनविण्यासाठी आवश्यक पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गावदेवी मंडईतील मूळ उद्देशापेक्षा वेगळे सुरू असलेले कपड्यांचे व्यवसाय बंद करण्यासाठी कारवाई केली जाईल. तसेच अतिरिक्त गाळे किंवा नियमबाह्य वापर आढळल्यास त्यावरही कठोर कारवाई होणार असल्याचे माळवी यांनी नमूद केले.

चर्चेदरम्यान भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी शहरातील हॉटेल्स, पोटमाळे आणि अनधिकृत इमारतींचा मुद्दा उपस्थित करत अग्निसुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. तर नगरसेवक सुनेश जोशी यांनी गावदेवी मंडईतील सुरक्षा रक्षकाच्या कॅबीनचे गाळ्यात रूपांतर करण्यात आल्याचा आरोप केला.

नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी प्रशासनावर टीका करत, फक्त कारवाई करू, उपाययोजना करू अशी उत्तरे दिली जातात. मात्र ती नेमकी केव्हा होणार याबाबत स्पष्ट वेळापत्रक दिले जात नाही, अशी नाराजी व्यक्त केली.

तीन महिन्यांच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण होणार

या सर्व प्रश्नांना उत्तर देताना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला. अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागातील भरती प्रक्रियेसाठी पुढील दोन दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून तीन महिन्यांच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी घोषणा केली.

तसेच शहरातील मॉक ड्रिलची परिणामकारकता आणि सुरक्षा मानकांची तपासणी केली जाईल. एका महिन्याच्या आत रुग्णालये, शाळा, व्यापारी संकुले आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांचे फायर ऑडिट पूर्ण करण्यात येईल. अग्निशमन जवानांसाठी विमा योजना, व्यावसायिक प्रशिक्षण आणि अत्याधुनिक उपकरणांच्या खरेदीवरही भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इमारतीमध्ये केवळ भाजी मंडईच चालणार

गावदेवी भाजी मंडईच्या घटनेनंतर आता या ठिकाणी केवळ भाजी मंडईचा चालणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या ठिकाणी कपडा आणि चपलांची देखील मोठ्या प्रमाणात दुकाने होती. त्यामुळे आग अधिकच भडकली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी केवळ भाजी मंडईलाच परवानगी दिली जाणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT