ठाणे: ठाणे महापालिकेच्या अग्निशन विभागात 600 रिक्त पदांची भरती प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून रखडली आहे. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेने अर्जदारांकडून प्रत्येकी 1000 रुपयांचे नोंदणी शुल्क घेऊनही अद्याप ही भरती प्रक्रिया राबवली नसल्याने संतापलेल्या अर्जदारांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासमवेत पालिका मुख्यालयात धडक दिली. तर येत्या पाच दिवसांत हा प्रश्न निकाली काढला नाही तरी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. यामध्ये फायरमन आणि ड्रायव्हर अशा 600 पदांसाठी पालिकेने जाहिरात काढली. या 600 पदांसाठी एकूण 2500 पेक्षा अधिक अर्ज आले असून प्रत्येक अर्जरदाराने 1000 रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे. मात्र सहा महिन्यांपासून या भरती प्रक्रिये संदर्भात कोणत्याच प्रकारची हालचाल करण्यात आलेली नाही.
सोमवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि अर्जदारांनी पालिका मुख्यालयात येऊन महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. मात्र त्यांच्याकडूनही यासंदर्भात काही ठोस आश्वासन मिळू शकलेले नाही. दुसरीकडे जे कंत्राटी पद्धतीने काम करत आहे त्यांचे कंत्राट नूतनीकरत असल्याची बाब आमच्या लक्षात आली असून जर ते कंत्राट नूतनीकरण करत आहात तर ही सरळ भरती प्रक्रिया का राबवली जात नाही असा प्रश्न अर्जदार गणेश आंधळे यांनी उपस्थित केला आहे.
भरतीप्रक्रिया लवकर राबवली नाही तर ठाणे महापालिकेवर मोर्चा
दरम्यान पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतल्यानंतर अविनाश जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मिरा-भाईंदरमध्ये स्थानिक आमदारांनी अशा प्रकारच्या भरती प्रक्रियेवर स्थगिती घेतली आहे. राजकीय मंडळी आणि अधिकाऱ्यांची ही कंत्राट असून त्यामुळेच ही भरती प्रक्रिया केली जात नसल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. तर ही भरती प्रक्रिया लवकर राबवली नाही तर ठाणे महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.