कृषी विभागातर्फे देण्यात येणारे मागील तीन वर्षांपासूनचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार येत्या रविवार, दि. 29 सप्टेंबर रोजी वितरित करण्यात येणार आहेत. कृषी पुरस्कारांच्या रकमेत तिप्पट वाढ केल्यानंतर होणारा हा पहिलाच कृषी पुरस्कार वितरण सोहळा आहे. कृषी पुरस्कारांची रक्कम याआधीच शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून मुंबईत प्रातिनिधिक स्वरूपात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत.
वित्त विभागाने मागील आठवड्यात कृषी पुरस्कार सोहळ्यासाठी आवश्यक 9 कोटींच्या फाइलला मान्यता दिल्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना निमंत्रण दिले. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत.
राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (आदिवासी), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न आणि उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार असे 209 पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतात. गेल्या दोन वर्षांचे पुरस्कार जाहीर झाले. मात्र त्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. याआधी कृषिरत्न पुरस्कारासाठी 75 हजार, कृषिभूषणसाठी प्रत्येकी 50 हजार, शेतीमित्र आणि युवा शेतकरी पुरस्कारासाठी प्रत्येकी 30 हजार, शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी प्रत्येकी 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येत होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या काळात झालेल्या कृषी पुरस्कार सोहळ्यात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी या पुरस्कारांची रक्कम तिप्पट करण्याची घोषणा केली होती.त्यानुसार रक्कम खात्यावर जमा झालेली आहे.
राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती व संस्था यांना विविध पुरस्कार शासनामार्फत जाहीर झाले असून शेतकर्यांचा सपत्नीक राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार होता. मात्र मागील सहा महिन्यांनंतरही कृषी विभागाला वेळ मिळत नसल्याने हे आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण रखडल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत होते.
दरम्यान सदर पुरस्कार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी वितरित होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यानुसार दैनिक पुढारीने, बळीराजाचे आदर्श शेतकरी पुरस्कार रखडले या आशयचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
कृषी पुरस्कार सन 2020 व 2021 या वर्षातील बक्षीसाची रक्कम वितरित करण्याबाबत शासन स्तरावरील शासन निर्णयानुसार सदर निधी बीडीएस प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे.मात्र काही पुरस्कारार्थी यांच्या खात्यावर निम्मेच रक्कम जमा झाल्याचे समजते.