डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील 50 लाखांहून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा करणारी उल्हास नदी मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागली आहे. कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रीत सांडपाणी मुळे नदीत वेगाने वाढत असलेली जलपर्णी दिसत आहे. कल्याणकर संस्थेने आंदोलनाचे खड्ग उपसताच शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार शुक्रवार (दि.18) रोजीपासून उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. जलपर्णी काढण्यासाठी स्वयंचलित मशीनचा वापर करण्यात येत असून ही जलपर्णी येत्या काही दिवसांतच उल्हास नदीतून हद्दपार होईल, असे सुरू केलेल्या कामावरून दिसून येते.
बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरातील गावांचे सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडले जाते. त्यामुळे उल्हास नदीचे अनेक ठिकाणी नाल्यात रूपांतर झाले आहे. काही वर्षांपासून नदीच्या पात्रात जलपर्णी फोफावत आहे. यावर्षी एक महिन्यापासून सतत आपटी, रायता, काम्बा, म्हारळ, सिमा रिसोर्ट, रिजेंसी एंटीलिया ते मोहन्यातील एनआरसी बंधाऱ्यापर्यंत उल्हास नदीच्या पृष्ठभागावर अवाढव्य जलपर्णी पसरत चालली आहे. मोहिली व मोहना बंधारा पाणी उपसा केंद्र येथे ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात अडकत आहे, नदीच्या पात्रात सोडल्या जाणाऱ्या औद्योगिक तसेच निवासी भागातील सांडपाण्यावर पुरेशा प्रमाणात आजही प्रक्रिया होत नाही. त्यामुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे.
22 मार्च रोजी जागतिक जलदिनी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, कैलास शिंदे, श्रीनिवास घाणेकर, सुदाम गंगावणे यांनी नदी पात्रात बसून आंदोलन सुरु केले होते. आठ दिवसांनी राज्य शासनाद्वारे बैठक घेऊन 15 दिवसांत मशीन लावून जलपर्णी काढण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिल्याने आंदोलन समाप्त करण्यात आले होते. अखेर स्वयंचलित मशीन लावून उल्हास नदीतील मोहना येथे जलपर्णी काढण्याचे काम शुक्रवार (दि.18) रोजीपासून सुरू करण्यात आले आहे. हे काम महाराष्ट्र प्रदुषण मंडळातर्फे करण्यात येत आहे. जलपर्णी मशीनद्वारे काढून ती नदी किनारी ठेवली जाईल. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींद्वारे या जलपर्णीची योग्य विल्हेवाट लावली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.