वागळे (ठाणे) : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. शिक्षण विभागाने ऐनवेळी कोणतीही पूर्वकल्पना न देता, कोणालाही विचारात न घेता परीक्षेच्या वेळापत्रकाचे आदेश काढल्याने शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षण विभागाकडून थेट वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यानुसार 8 एप्रिलपासून विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होऊन ती 25 एप्रिलपर्यंत संपणार आहे. तसेच या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. 2 मे पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून शिक्षक, मुख्याध्यापकांनी संबंधित संघटना, शिक्षक, पदवीधर आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत आपल्या भावना व्यक्त केल्या व परिस्थितीची जाणीव करून दिली. शिक्षक संघटना, शिक्षक व पदवीधर आमदार, लोकप्रतिनिधींनी या संदर्भात पालक व शिक्षकांच्या अडचणी प्रशासन व शिक्षणमंत्री यांच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु या प्रयत्नांना यश आले नाही. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने शासनाने घेतलेला निर्णय बरोबर आहे. परंतु हा निर्णय ऐन परीक्षेच्या कालावधीत घेणे चुकीचे आहे.
हा निर्णय परीक्षेच्या कालावधीपूर्वी 4 ते 5 महिने अगोदर घेतला असता तर शाळेने नियोजनात बदल केले असते. शिक्षक 1 मे पर्यंत शाळेत असणार आहेत. शासनाने दिलेली कामे कर्तव्य समजून शिक्षक पार पाडणार आहेत. परंतु विद्यार्थी व पालकांची यामध्ये गोची निर्माण झाली आहे. परराज्यांमधून रोजीरोटी, व्यवसायासाठी आलेली अनेक कुटुंब महाराष्ट्रात वास्तव्य करत आहेत. गेली अनेक वर्षापासून दहा ते पंधरा एप्रिलपर्यंत वार्षिक परीक्षा संपत असतात. तसेच अनेक वर्ष हे कुटुंब गावी गेले नसतात त्यामुळे वर्षभरापूर्वीच आपल्या मूळ गावी असलेले कामाचे नियोजन करत असतात.
सध्याही 11 ते 20 एप्रिल दरम्यान रेल्वेचे बुकिंग करून ठेवलेले आहेत. मागील शैक्षणिक सत्रापर्यंत इ.8वी पर्यंत अनुत्तीर्ण न करण्याचे शासन निर्णयाने शेवटची परीक्षा नाही दिली तरी वर्षभराच्या मूल्यमापनावर विद्यार्थी पास होतात. अशी पालकांची मानसिकता झाली आहे. 8 ते 25 एप्रिलपर्यंत होणार्या परीक्षेमध्ये मुले अचानक पालकांसोबत जर गावी गेली तर त्यांच्या परीक्षा कधी घ्यायच्या., त्यांचे निकाल पत्रक कसे बनवायचे आदी प्रश्न मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर उभे राहिलेले आहेत.