ठाणे : गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या अन्न पदार्थांचे आणि अन्नाचे प्रसाद म्हणून वाटप केले जाते. या प्रसादाच्या सेवनातून अनेकदा विषबाधा झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांकडून तयार करण्यात येणार्या प्रसादावर अन्न आणि औषध प्रशासनाचा वॉच असणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांकडून विविध प्रकारचे भंडार्यांचे आयोजन केले जाते. तसेच भाविकांना वाटण्यात येणार्या प्रसादातही वैविध्यता असते. गणेश मंडळांचा प्रसाद वाटपाचा हेतू चांगला असला तरी अनेकदा काही वेळा मानवी चुकांमुळे विषबाधा सारख्या घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांकडून भाविकांना देण्यात येणार्या प्रसादाबाबत मार्गदर्शक सूचना यंदाही जारी केल्या आहेत.
गणपती मंडळांनी स्वतः तयार केलेल्या प्रसादाचेच वाटप करावे, प्रसादासाठी वापरला जाणारा शिधा व अन्न पदार्थांची गुणवत्ता तपासून घ्यावी, प्रसाद तयार करण्याची जागा, भांडी स्वच्छ असावीत. सणासुदीच्या काळात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, तूप यासारख्या अन्न पदार्थांमध्ये वाढत्या मागणीमुळे भेसळ होण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर किराणा मालाच्या दुकानांची तपासणी अन्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
प्रसादाच्या सेवनातून विषबाधा झाल्याच्या काही घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही वेळा भाविकांनी तयार करून आणलेल्या प्रसादाचे वाटप केले जाते. या प्रसादाबद्दल कार्यकर्त्यांना कोणतीच कल्पना नसते, त्यामुळे प्रसाद वाटप करताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, शक्यतो प्रसादात कोरड्या पदार्थांचा समावेश करावा.महेश चौधरी, सहआयुक्त, अन्न प्रशासन कोकण विभाग