ठाणे : ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलजवळ असलेल्या भुर्जी पावच्या गाडीवर सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावरच एका टोळक्याने बियरच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
या घटनेत 17 वर्षीय युवक आणि त्याचे वडील असे दोघे पिता पुत्र जखमी झाले आहेत. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेतील तक्रारदार युवक सेवालाल नगर परिसरात राहत असून तो बाहेरून दहावीची परीक्षा देत आहे. त्याची आई या त्याचपरिसरात भुर्जीपावची हातगाडी लावतात. तसेच तो आईला मदत करतो.
शनिवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार आणि त्याची आई गाडी बंद करताना, त्याचा मामा आणि मामाचा मित्र गप्पा मारत होते. त्यावेळी एका दुचाकीवरून तिघेजण तसेच दुसऱ्या दुचाकीवरून काहीजण आले. यावेळी त्यांनी मोटारसायकल गप्पा मारत असलेल्या मामा आणि त्याच्या मित्राच्या मधून आणली. त्यामुळे तक्रारदारांच्या मामाने त्यांना याबाबत विचारणा केली. याचा राग मनात धरून त्या सातजणांनी त्या दोघांना शिवीगाळ केली.
यावेळी तक्रारदार युवक टोळक्यास समजावण्यासाठी गेल्यावर एकाने त्याच्या कानाखाली मारली. तसेच त्याच्या मित्राने बियरची बाटली तक्रारदारांच्या डोक्यात फोडली. त्यावेळी मधे पडलेल्या तक्रारदारांच्या आई वडिलांना लाथाबुक्क्यांनी देखील मारहाण केली. त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत करण्यात आली असून तक्रारदारांच्या कपाळालाही दुखापत झाली आहे.
दरम्यान त्या सातजणांनी तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वागळे इस्टेट पोलिसांकडून करण्यात येत आहेत.