Suran Cultivation Pudhari
ठाणे

Suran Cultivation: ठाणे जिल्ह्यात प्रथमच होणार सुरणाची शेती

दापोली कृषी विद्यापीठाकडून ७४५ क्विटल सुरण बियाणांचा पुरवठा; १४९ शेतकऱ्यांना अनुदान

पुढारी वृत्तसेवा

अनुपमा गुंडे

ठाणे: पारंपारिक पीक पध्दती आणि बदलत्या हवामानामुळे शेतकर्यांना अपेक्षित उत्पन्न मिळेल, याची श्वाश्वती राहिली नसल्याने बळीराजाला आर्थिक बळ देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात यंदा प्रथमच सुरणाची लागवड करण्यात येणार आहे.

या लागवडीसाठी कृषी विभागाने जिल्हा वार्षिक योजनेतून शेतकऱ्यांना सुमारे 50 लाखांचा निधी अनुदानाच्या पोटी मिळणार असून दापोलीच्या कृषी विद्यापीठाच्या वतीने 745 क्विटल सुरण बियांचा पुरवठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यात यापूर्वी शेतकरी घरगुती स्वरूपात आपल्या इच्छेनुसार सुरणाची लागवड करत असत. मात्र अलीकडच्या काळात मुंबई व ठाणे जिल्ह्यातील भाजीबाजारात सुरणाची मागणी वाढली आहे, हे लक्षात घेवून व शेतकर्यांना आर्थिक बळ देण्यासाठी सुरणाच्या शेतीसाठी प्रोत्साहित केले जाते आहे.

जिल्ह्यात शहापूर तालुक्यात ५२, मुरबाडमध्ये ४५, भिवंडीत २५, कल्याणमध्ये १३ आणि अंबरनाथमध्ये १३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ७४५ क्विंटल सुरण बियाण्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यातून सुरण लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा कृषी विभागाला आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १४९ शेतकऱ्यांना लाभ दिला असून, सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ७५ टक्के, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान सुमारे ०.१० हेक्टर क्षेत्रासाठी देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील हवामान व जमीन सुरण लागवडीस पोषक असल्याने हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक लागवड तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन, पीक संरक्षण तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे.

दर हेक्टरी सरासरी 25 ते 35 टन हेक्टरी उत्पादन होणार आहे. सुरण हे कंदवर्गीय पीक असून त्याला मुंबईसारखी मोठी व कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे या पिकाला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता असते. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे हे पीक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीबरोबरच ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही चालना देणार आहे.

सुरण खाण्याचे फायदे

  • सुरणात फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

  • पचनक्रिया सुधारते : सुरणामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते बद्धकोष्ठता दूर करते. ते आतड्यांची हालचाल सुरळीत करून पचनशक्ती वाढवते.

  • मूळव्याधासीठी उपयोगी : आयुर्वेदात सुरणाचा उपयोग मूळव्याधीच्या उपचारात केला जातो. यातील दाहक-विरोधी गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात.

  • रक्तातील साखर नियंत्रित राहते: ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. त्यामुळे मधुमेहींसाठी हा एक चांगला आहार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT