डोंबिवली : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणच्या भरारी पथक प्रमुख दिपक परब यांच्या पथकाने कल्याण जवळच्या नेवाळी परिसरात सापळा लावला होता.
बनावट विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. गोव्यावरून स्वस्त दराची दारू आणून ती विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यामध्ये भरून बाटलीला नव्याने स्टिकर लावून विक्री करण्यात येत होती. भरारी पथकाने केलेल्या कारवाईत 19 लाख रूपये किंमतीची बनावट विदेशी दारू जप्त करून तिघांची धरपकड केली. केली.
या कारवाई दरम्यान भरारी पथकाने श्रीकांत टरले, किशोर पाटील आणि प्रदीप बामणे या तिघांना ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या पथकाला बनावट विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पथक प्रमुख अधिकारी दिपक परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या नेवाळी परिसरात जाळे पसरले होते. याच दरम्यान एक संशयित कार येताना आढळली. पथकाने कार थांबवून झडती घेतली असता या कारमध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला. पथकाने कारसह हा साठा हस्तगत करून तिघांना ताब्यात घेतले. या त्रिकुटाकडून बनावट दारू बनविणाऱ्या माफियांपर्यंत पोहोचणे उत्पादन शुल्क विभागाला आता शक्य होणार आहे.
जप्त केलेल्या दारूचा माग काढला असता ही दारू बनावट असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. पथकाने तात्काळ कार चालकाला ताब्यात घेतले. तपासा दरम्यान त्याने ही दारू भिवंडी तालुक्यातील पडघ्यात असलेल्या गोडाऊनमधून आणल्याचे सांगितले. त्यानुसार भरारी पथकाने पडघा येथील गोडाऊनवर छापा टाकला. या गोडाऊनमध्ये देखील बनावट दारूचा साठा आढळून आला. तर तपासा दरम्यान कर्जतमध्ये देखील या बनावट दारूचे गोडाऊन असल्याचे माहिती मिळाली.
भरारी पथकाने कर्जतमध्ये देखील छापा टाकत बनावट दारूचा मोठा साठा जप्त केला. या गोडाऊनमध्ये दारूच्या साठ्यासह दारूच्या बाटल्यांवर लावण्यात येणारे बूच, बनावट लेबल, रिकाम्या बाटल्या देखील जप्त करण्यात आल्या. तब्बल 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाने श्रीकांत टरले, किशोर पाटील, प्रदीप बामणे या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांच्या व्यतिरिक्त टोळीत आणखी कुणी आहे का ? याचा शोध आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पथक करत आहे.