डोंबिवली : थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या ग्राहकांसाठी महावितरणने आणलेल्या अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या कल्याण आणि भांडूप परिमंडळातील 7 हजार 891 ग्राहकांना पुन्हा वीजजोडणी मिळाली.
कल्याण आणि भांडूप या दोन्ही परिमंडलातील 13 हजार 848 ग्राहकांनी योजनेत सहभाग घेत 30 कोटी 62 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला. त्यांना थकीत रकमेवर विलंब आकार व व्याज माफीसह मूळ थकबाकीत 5 ते 10 टक्क्यांची सवलत मिळाली. येत्या मार्च अखेरला योजनेची मुदत संपत आहे. या लाभापासून वंचित दोन्ही परिमंडळातील उर्वरित ग्राहकांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज करून संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
अभय योजनेनुसार मार्च 2024 अखेर किंवा तत्पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेले लघुदाब व उच्चदाब ग्राहक (सार्वजनिक पाणीपुरवठा व कृषीपंप ग्राहक वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ होईल. योजनेतील सहभागी ग्राहकांना एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तर थकबाकी एकरकमी भरणाऱ्या उच्चदाब ग्राहकांना मूळ थकबाकीवर 5 टक्के आणि लघुदाब ग्राहकांना 10 टक्के अतिरिक्त सवलत मिळत आहे.
मूळ थकबाकी एकरकमी अथवा 30 टक्के रक्कम भरुन योजनेत सहभागी होता येईल. त्यानंतर मागणीप्रमाणे तत्काळ पुन:र्जोडणी अथवा नवीन वीजजोडणी मिळेल. त्यासाठी पात्र ग्राहकांनी https://wss.mahadiscom.in/wss/wss या पोर्टलवर केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
कल्याण परिमंडळातील 9 हजार 578 ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. यातील ८ हजार ३९४ ग्राहकांनी आत्तापर्यंत 15 कोटी 41 लाख रुपयांचा भरणा केला असून त्यातील मागणी करणाऱ्या 5 हजार 250 जणांना पुन:र्जोडणी अथवा नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. महावितरणच्या भांडूप परिमंडळातील 5 हजार 970 ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. यातील 5 हजार 454 ग्राहकांनी आत्तापर्यंत 15 कोटी 21 लाख रुपयांचा भरणा केला असून त्यापैकी 2 हजार 641 जणांना त्यांच्या मागणीप्रमाणे पुन:र्जोडणी किंवा नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे
वीज देयक थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची महावितरणची मोहीम सुरूच आहे. ही मोहीम येत्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे कटू कारवाई टाळण्यासाठी कल्याण परिमंडळातील ग्राहकांनी विहित वेळेत थकित वीज देयक भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.