डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : गणपती आणि नवरात्र मोठ्या उत्साहात पार पडले. आता दिवाळी सरली तरी कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागत नाही. त्यामुळे मंत्र्यांमध्ये रस्त्यावरून श्रेयाचे राजकारण सुरू असताना रस्त्यावर नेमका डांबर कधी पडणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावरून सुखकर प्रवास करण्यासाठी कल्याण डोंबिवलीकरांना आणखी किमान दोन महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. तर एमएमआरडीएकडून अद्यापही कामे सुरू झाली नसल्याने नागरिकांमध्ये असलेला नाराजीचा सुर समाज माध्यमांवर उमटू लागला आहे. समाज माध्यमांवर पुन्हा एकदा डोंबिवलीकर मिम्सचा पाऊस पाडत आहेत.
डोंबिवली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. इतकेच नव्हे तर नागरिकांनी रस्त्यावर उतरुन घंटानाद केला. त्यानंतर अनेक भागातील रस्त्यांवरील खड्डे कल्याण डोंबिवली महापालिकेने बुजवायला सुरुवात केली. असे असले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणारे रस्ते चांगले होण्यासाठी डोंबिवलीकरांना आणखी किमान दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढारीशी बोलताना दिली.
दरम्यान, साबांखा विभागाने निविदा काढल्या असून त्या भरण्यासाठी तारीख वाढवण्यात येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. घरडा सर्कल ते टाटा पॉवर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची निविदा काढली असली तरी निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत साधारण 15 दिवसांचा कालावधी जाणार आहे . त्यांनतर काम सुरू व्हायला 15 दिवस आणि काम पूर्ण व्हायला एक महिना लागणार आहे. त्यामुळे साधारण नागरिकांना चांगल्या रस्त्यासाठी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विशेष म्हणजे डोंबिवलीकर असणारे आमदार रवींद्र चव्हाण हेच या विभागाचे मंत्री असून मध्यंतरी त्यांनी एका कार्यक्रमात रस्त्यावरील खड्डयांचे पाप माझे नसून ज्यांचे आहे त्यांनी ते लवकर पुसा असा अप्रत्यक्ष टोलाच मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुपुत्रांना लगावला होता. इतकेच नव्हे तर माझ्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर खड्डे नसल्याचे देखील त्यानी संगितले होते. तसेच कोकणातील रस्त्यांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी कोकण दौरा देखील केला होता. मात्र कल्याण डोंबिवलीतले रस्ते त्यांना दिसले नाहीत का अशी चर्चा शहरात रंगली आहे.
औद्योगिक क्षेत्रात साधारण 55 कोटी आणि औद्योगिक क्षेत्रातील निवासी भागात 55 कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे हे रस्ते सुरुवातीला कल्याण डोंबिवली महापालिका करणार होती. मात्र त्यानंतर ते काम कल्याण डोंबिवली महापालिकेने (एमएमआरडीए) कडे सोपवले. मात्र अद्यापही निवासी भागातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली नसून औद्योगिक भागातील रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत.
हेही वाचा