कापलेल्या भाताचे भारे बांधण्यासाठी बांबूंपासून तयार केलेले बंध Pudhari news network
ठाणे

ठाणे : भाताचे भारे बांधण्यासाठी ‘बांबू बंध’ विक्रीतून आदिवासींना रोजगार

Employment to Tribal : 400 हून अधिक कुटूंबांची चालते उपजीविका

पुढारी वृत्तसेवा

पालघर : परतीच्या पावसाने कोकण पट्ट्याला पुरते झोडपून काढले आहे. दुपारी कडक उन्ह तर सायंकाळी मुसळधार पाऊस यामुळे ऐन भात शेती कापणीच्या हंगामात भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाने उघडीप घेताच शेतकरी भात कापणीच्या कामाला सुरुवात करत आहे. यामध्ये बांबूंपासून तयार केलेले बंध मुळे आदिवासी बांधवांना रोजगार मिळू लागला आहे.

कापलेल्या भाताचे भारे बांधण्यासाठी बांबूंपासून तयार केलेले बंध वापरात येत असून शेतकरी वर्गातून मोठी मागणी आहे. साहजिकच या माध्यमातून आदिवासी बांधवांना रोजगार मिळू लागला आहे.

शेतकर्‍यांसाठी भाताचे भारे बांधण्यासाठी लागणारे बंध (बांबूपासून तयार केलेला दोर) विक्रीतून अनेक आदिवासी कुटुंबियांना दोन महिन्यांसाठी चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील चारशेहून अधिक कुटुंबांचे उपजिविकेचे हे एक साधन बनले आहे. कोरोना काळात आदिवासींना बंध विक्रीचा व्यवसाय करता आलेला नव्हता. तर गतवर्षी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर भाताचे नुकसान केल्याने अनेक शेतकर्‍यांनी बंधांचा वापर केला नव्हता.

या वर्षी मात्र भात पिकाचे चांगले उत्पन्न आल्याने भारे बांधण्यासाठी मोठ्या संख्येने बंधांची मागणी वाढली आहे. बहुतांश शेतकरी 500 ते 1000 बंध खरेदी करताना शेतकरी दिसत आहेत. यामुळे वाडा, विक्रमगड तालुक्यातील शेकडो आदिवासींना या वर्षी चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

असे बनवितात बांबूपासून बंध

दोन ते तीन दिवसांपूर्वीच तोडलेल्या ओल्या बांबूचे 5 ते 6 फूट लांबीच्या अंतरावर तुकडे केले जातात. हे तुकडे दगडावर ठेचून 3 ते 4 दिवस सुकविले जातात आणि शंभर बंधांचा गठ्ठा करुन प्रती शेकडा दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत बाजारपेठेत विकायला आणले जातात. काही दलाल या बंधची एकदमच खरेदी करून बाजारपेठेत दिवसभर विक्रीसाठी बसत असतात.

अनेकांना चांगला रोजगार

वाडा तालुक्यातील परळी, ओगदा, उज्जेनी, आखाडा या भागातील शेकडो आदिवासी महिला व पुरुष बंध विक्रीचा दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत हा व्यवसाय करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून येथील अनेकांना चांगला रोजगार मिळत असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT