सापाड (ठाणे) : कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील राजकारण चांगलेच तापले आहे. युती टिकवण्यासाठी वरच्या पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी खालच्या पातळीवर मात्र या युतीला तीव्र विरोध होत असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी थेट भूमिका मांडत शिव-सेना भारतीय जनता पार्टीला कधीही मदत न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी जोरदार पलटवार करत नरेंद्र पवार यांच्या भूतकाळातील भूमिका व्यक्त केली आहे.
नरेंद्र पवार यांनी युतीविरोधात उघड भूमिका घेत कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेने आजपर्यंत भाजपला कधीच मदत केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. युती झाली तरी कार्यकर्ते मनापासून युतीसोबत काम करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणी करत त्यांनी युती होऊ नये, यासाठी थेट भूमिका मांडत भाजपने थेट सर्व १२२ जागा लढवण्याचा मानस जाहीर केला. यावर शिवसेना आक्रमक झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत नरेंद्र पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "आई दुर्गा भवानी नरेंद्र पवारांची इच्छा पूर्ण करो," अशी उपरोधिक प्रार्थना करत मोरे यांनी पवार यांच्या भूतकाळातील भूमिकेची आठवण करून दिली.
त्यांनी सांगितले की, नरेंद्र पवार यांनी यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्या बंडखोरीमुळे पक्षाने त्यांना सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. मात्र, काही दिवसांतच त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले होते, असेही मोरे यांनी स्पष्ट केले. आमच्या पॅनलमध्ये जास्त नगरसेवक शिवसेनेचे असतानाही
भाजपाला उमेदवारी दिली जाते. त्यामुळे आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही बंडखोरीची भावना निर्माण होते. मात्र, अशी भाजपमधील बंडखोरी शमवण्याचे काम वरिष्ठ नेत्यांचे असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे समन्वयाचा अभाव वारंवार समोर येत आहे. उमेदवारीच्या प्रश्नावरून दोन्ही पक्षांत नाराजी वाढताना दिसत आहे.
नाराजांची नेत्यांकडे धाव
रविवारी सकाळीच कल्याण-डोंबिवलीतील इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कल्याण-शिळ महामार्गावरील पलावा गृहसंकुलात असलेल्या घराकडे धाव घेतली. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी आमदार नरेंद्र पवार यांना युतीसंदर्भात, युतीमधील जागा वाटप आणि आम्हाला उमेदवारी मिळणार की नाही ? याची विचारणा करण्यासाठी इच्छुक उमेदवार गेले होते.
इच्छुकांनी आता करायचे काय ?
कल्याण पूर्वेत भाजपाच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयात जाऊन इच्छुक उमेदवार, तसेच भाजपाच्या कार्यकत्यांनी कल्याण पूर्वेत सात जागा भाजपच्या वाट्याला कशा आल्या ? जागा वाटपात झालेली चेष्टा नाही का ? कल्याण पूर्वेत भाजपाचा आमदार आहे. या भागात भाजपाचा विस्तार व्हावा, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून भाजपाचे कार्यकर्ते तळमळीने काम करत आहेत. मग मोजक्याच जागा पदरात पाडून भाजपाने काय साधले ? इच्छुकांनी आता करायचे काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करून कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांच्या समोर आपली नाराजी व्यक्त केली.