Badlapur Politics BJP NCP Ajit Pawar Alliance against Eknath Shinde Shivsena
पंकज साताळकर
बदलापूर : आगामी कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) आणि भाजपने युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी नगपालकेतील भ्रष्टाचार मिटवून टाकण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया यानंतर दिली आहे. असं जरी असलं तरी यामागे ठाणे जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेतील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना परतफेड म्हणून भाजपने आता राष्ट्रवादीशी युती करून जिल्ह्यात आपलं वर्चस्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आणखी घट्ट करण्यासाठी राष्ट्रवादीशी जवळीक साधली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्यातील तीन पक्षाच्या युतीतील वर्चस्वाची लढाईची किनार असल्याचं बोललं जात आहे. कारण वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी उघड उघड लढाई ठाणे- नवी मुंबईत रंगली आहे. मात्र या दोन्ही बड्या महापालिका असल्यामुळे तेथे युतीत मिठाचा खडा पडल्यास त्याचा नेमका काय परिणाम होईल, याची चाचणी सुरू असतानाच बदलापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपने हात मिळवणी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याचे प्रयत्न केल्याचे बोललं जात आहे.
बदलापुरात भाजप आणि राष्ट्रवादीची निवडणूक पूर्व ही पहिल्यांदाच युती असली तरी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला रोखण्यासाठी 2010 सालीही राष्ट्रवादी भाजप युती होऊन शिवसेनेचा नगराध्यक्ष होण्यापासून रोखले होते. त्यामुळे भाजप - राष्ट्रवादीच्या युतीचा दुसऱ्यांदा हा प्रयोग बदलापुरात होत असल्याने 2010 ची पुनरावृत्ती होणार का ? हा प्रश्न आहे. कारण यंदा थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. बदलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे थेट नगराध्यक्ष पदावर डोळा ठेवून बसलेल्या शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांना पाच वर्षांसाठी नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपतर्फे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेतर्फे माजी शहरप्रमुख, एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वामन म्हात्रे यांनी कंबर कसली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकां वेळेस शिवसेना-भाजपची राज्यात युती असताना मात्र राष्ट्रवादी आणि भाजपचे सूत जुळले होते. मात्र, शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात काम करत असल्याचे बदलापुरात चित्र होते. त्यामुळे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नक्की भाजप राष्ट्रवादीच्या युतीमुळे राष्ट्रवादीला यातून नवसंजीवनी मिळू शकते. कारण बदलापूर शहरात यापूर्वी राष्ट्रवादीचे अवघे दोनच नगरसेवक होते. त्यामुळे भाजपासोबत हात मिळवणी केल्यानंतर त्यांच्या पदरात आणखीन काही वाढून येण्याची शक्यता आहे.
नगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात ही युती झाल्याचे बोलले जात असले तरी यापूर्वी बदलापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपनेही आळीपाळीने मिळून सत्तेचा मलिदा चाखला आहे. त्यामुळे बदलापूर नगरपालिकेत टीडीआर घोटाळा, बीएसयुपी मोबिलायझेशन अॅडव्हान्स घोटाळा, प्रशासकीय इमारत टेंडर घोटाळा यामुळे अनेक आजी-माजी नगरसेवकांवर गुन्हे दाखल आहेत. यात शिवसेना-भाजप आणि तत्कालीन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचाही सहभाग आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीशी केलेल्या हात मिळवणीला शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व आणि एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यातच वर्चस्व निर्माण करण्याला दिलेल्या आवाहनाला राज्य पातळीवर कशाप्रकारे घेतले जाणार? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, बदलापूर नगरपालिकेच्या निमित्ताने भाजप राष्ट्रवादीची झालेली युती आणि शिवसेनेची एक हाती असलेली बदलापूर नगरपालिकेवरील सत्ता कायम राहणार का ? की 2010 ची पुनरावृत्ती घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.