खानिवडे : दसर्यात आपट्याची अर्थात शमीची पाने एकमेकांना देऊन सोने लुटण्याचाी प्रथा आहे .मात्र भरमसाठ वृक्षतोडीचा परिणाम या आपट्याच्या झाडांनाही बसला असून त्यांची ही संख्या इतर मौल्यवान वृक्षांप्रमाणे कमी झाली आहे .त्यामुळे दसर्याच्या सोने लुटणे आता लुप्त होण्याच्या मार्गावर आले आहे.
दसर्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडांची पाने लुटण्याची परंपरा आहे. मात्र बदलत्या काळाच्या ओघात आपट्याची झाडेच कमी होऊ लागल्याने एक प्रकारे आपट्याच्या पानांचे सोने लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कारण वसईत होत असलेल्या प्रचंड वृक्षतोडीमुळे होऊ घातलेल्या व होणार्या विकासकामांमुळे भूमाफियांच्या अतिक्रमणामुळे आणि मानवाचा नको तितका हस्तक्षेप हा वनसंपदा ओरबाडण्याकडे झुकल्याने साग, अईन, खैर सारख्या मौल्यवान वृक्षांप्रमाणे आपटा ही आता वसईत अत्यंत दुर्मिळ झाला आहे. जे काही सोनं म्हणून आपट्याची पाने विक्रीसाठी उपलब्ध आहेत ती जास्त करून वसईच्या बाहेरून येतात.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा दसरा सण सर्वांच्या साठी उत्साह आणि नवं चैतन्य घेऊन येत असतो. या दसर्याच्या दिवशी आपट्याची पाने सोन म्हणून वाटून सण साजरा करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. विशेषतः ग्रामीण भागात ही प्रथा आजही सर्वाधिक दिसून येते. त्यामुळे दसर्याच्या दिवशी आपट्याचे झाड व त्याच्या पानांना फारच महत्व आहे. विशेषतः जंगल परिसरात, डोंगराळ भागात या आपट्याच्या पानांची वृक्ष आढळून येतात. तर काही जण आपल्या वाडीत, घराच्या जवळपास ही अशा वृक्षाची लागवड करतात. पूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक घरात काबाड कष्टाची कामे करणार्यांना विडी ( प्रचलित शब्द वावली , जी आपट्याच्या पानात तंबाखू वापरून विडी प्रमाणे वाळली जायची ) लागायची. त्यासाठी घरांच्या आसपास खास करून एक तरी आपट्याचे झाड असायचेच. मात्र आता ती झाडे फार दुर्मीळ आहेत. याला कारण म्हणजे चाललेली विकास कामे व वृक्ष तोड, जंगलाला आगी लागण्याचे प्रकार यामुळे जंगल पट्टा सुद्धा कमी होऊ लागला आहे. तर नवीन वृक्ष लागवड करण्याचा अभाव , आणि पगवड केली तरी संगोपन शून्य. त्यामुळे आपट्याची झाडे ही दिसून येत नाहीत.