ठाणे : मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार मतदार यामुळे चौफेर टीका झालेल्या ठाणे महापालिकेने देखील ठाण्यात दुबार मतदार असल्याची कबुली दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 83 हजार 644 संभाव्य दुबार नावे असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने दिली असून ही यादी पालिकेने आपल्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या दुबार मतदारांचा घोळ निस्तरण्यासाठी पालिकेला मोठी यंत्रणा राबवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीवरून महाविकास आघाडीकडून आरोप, प्रत्यारोप केले जात आहेत. दुबार नावांचा मुद्दा मनसे आणि उद्धव सेनेने पुराव्यांसह सादर केला असताना आता ठाणे महापालिकेनेच संभाव्य दुबार नावांची यादीच जाहीर केली आहे. या यादीत 83 हजार 644 संभाव्य दुबार नावे असल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक प्रभागात 200 ते 300 नावे ही दुबार असल्याचे यादीवरून स्पष्ट होत आहे.
ठाणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. 2017च्या निवडणुकीमध्ये 12 लाख 28 हजार 606 इतकी मतदारांची संख्या होती. आता मतदारांची ही संख्या तब्बल 4 लाख 21 हजार 261 ने वाढली आहे. महापालिकेने दिलेल्या माहिती नुसार मतदारांची आताची संख्या ही 16 लाख 49 हजार 867 एवढी झाली आहे.
यात पुरुष मतदारांची संख्या 8 लाख 63 हजार 878 आणि स्त्री मतदारांची संख्या 7 लाख 85 हजार 830 एवढी आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती सुचनांसाठी महापालिकेने कालावधी दिला होता. त्यानुसार 10 डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. असे असतांना हरकती सुचनांचाही या कालावधीत पाऊस पडल्याचे दिसून आले आहे.
दुसरीकडे सादर झालेल्या प्रारूप मतदार यादीतील घोळावरून मनसेने महापालिकेला दोनदा लक्ष केले होते. त्यातही ठाण्याच्या यादीत नवी मुंबईची नावे असाही काहीसा प्रकार उजेडात आणला होता. त्यानंतर उद्धव सेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनीही दुबार नावावरून महापालिकेला धारेवर धरले होते. त्यांनी पुराव्यानिशी दुबार नावांचा पदार्फाश केला.
असे असताना आता ठाणे महापालिकेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दुबार नावांची संभाव्य यादीच जाहीर केली. त्यानुसार या यादीत 83 हजार 644 नावे दुबार असल्याचे दिसून आले. महापालिकेने दुबार नावांची झालेली चूक मान्य केल्याचेही दिसून आले आहे. या दुबार नावांमध्येही नावातील सार्धम्य, फोटो नसणे, एकाच नावाची दोन व्यक्ती असे काही प्रकार त्यात दिसून येत आहेत.
मतदार याद्यांमधील घोळ का?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका निवडणुकासाठी प्रभागनिहाय विभाजन केले जाते. मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. त्यामुळे मतदारांचे प्रभाग बदलत असल्याचे समोर आले आहे.