ठाणे : कुर्ला बेस्ट अपघाताच्या पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग अलर्ट मोडवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होणार नाही याची दखल घेत ठाणे शहरातून धावणार्या सर्व बस प्राधिकरण चालकांची ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी करण्यात आली. गेले तीन दिवस रात्रीच्या वेळी बस थांब्यावर बस थांबवून सुमारे 100 बस चालकांची ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी करण्यात आली.
वाहतूक नियम डावलून वाहन चालवल्यावर रस्ते अपघात होण्याची दाट शक्यता असली, तरी काही चालक बेफामपणे वाहन चालवताना दिसतात. गेल्याच आठवड्यात कुर्ल्यातील बस दुर्घटनेत काही व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. या अपघाताची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. त्यानुसार ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने देखील या पुढे असा अपघात घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील बस थांब्यावर उभे राहून विभागाच्या वायुवेग पथकाने विविध बस प्राधिकरणाच्या 100 चालकांची ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. तीनहात नाका, नितीन जंक्शन, घोडबंदर रोड अशा विविध ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी केली.
गेल्या सहा महिन्यांपासून दुचाकी आणि चारचाकी ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम सुरूच आहे. मात्र आता खास प्राधिकरण बस चालकांची रात्रीच्या वेळी तपासणी सुरू केली आहे. चालू बस थांबवून ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी मोहीम न घेता वायूवेग पथकातील अधिकारी आणि कर्मचारी बस स्थानकावर थांबून चालकांची तपासणी केली. या तपासणी मोहिमेचे प्रवाशांनी स्वागत करून, प्रादेशिक परिवहन विभागाचे कौतुक देखील केले होते. अशी तपासणी मोहीम कायमच सुरू ठेवावी, असा सल्ला प्रवाशांनी दिला.रोहित काटकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे