ठाणे : रस्त्यावरील वाहनांची वाढती वाहतूक पाहता सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अवघड होऊन जाते. अशातच नशेखोरांचा त्रास येथील जनतेला सहन करावा लागत असल्याने येथील पदपथांवर सुरक्षा रक्षक तसेच सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याची मागणी येथील नागरिकांतून होत आहे.
दरम्यान दिवसेंदिवस वाढत्या नशेखोरांच्या भीतीमुळे पदपथावरून चालणेसुद्धा नागरिकांना जोखमीचे झाले आहे. अलीकडेच गांधी उद्याना बाहेरच्या पदपथावरून चालत जात असलेल्या एका पादचाऱ्याला काही तरुण गर्दुल्याने विनाकारण शिवीगाळ केली. यामुळे पादचाऱ्याने त्या नशेखोरांला जाब विचारताच पादचाऱ्यावर त्यापैकी काहीजण मारण्यासाठी धावून गेले. परंतु त्याने परिस्थिती पाहता वेळीच तिथून पळ काढला म्हणून तो थोडक्यात बचावला. दरम्यान ठाणे रेल्वे स्थानक, इतर उड्डाणपुलावर देखील गर्दुल्यांचे, दारुड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात नवतरुण वर्ग भरपूर प्रमाणात दारू आणि इतर अमली पदार्थांचे सेवन करताना दिसून येतात.
नशेच्या गुंगीमध्ये इतर नागरिकांना दमदाटी, धक्काबुक्की, शिवीगाळ आणि कित्येक वेळा मारहाण करताना आढळतात. तसेच स्थानिक पोलीस चौकीमध्ये यांची तक्रार केली असता. विशेष परिणाम झाल्याचे दिसत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. गांधी उद्यानाबाहेरील मार्गावरून बऱ्याचदा महिला सुद्धा ये-जा करत असतात. दरम्यान या ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत अथवा अशा जागेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी येथील नागरिकांतून व्यक्त होत आहे.
उपाययोजनांची मागणी
ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरच्या परिसरात तसेच स्थानकावरील पादचारी पुलांवर बऱ्याचदा नशेखोर बसलेले असतात. तसेच ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना मारहाण आणि चोरी सारखे गुन्हे काही गर्दुल्ले करतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांची मागणी होत आहे.