Thane drug trafficking pudhari photo
ठाणे

Thane drug trafficking : ठाण्‍यात ५ कोटी ६६ लाखांचे एमडी जप्त

चार ड्रग्ज तस्कर अटकेत; ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाईत चार ड्रग्ज तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. या तस्करांच्या ताब्यातून ५ कोटी ६६ लाख ३७ हजार रुपये किमतीचे २ किलो ८२३ ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात एमडी हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी कासारवडली व कोपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ तस्करी व विक्री करणाऱ्याविरोधात विशेष कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे घोडबंदर रोड आणि कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी कारवाई करीत २ किलो ८२३ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले.

पहिली कारवाई १ सप्टेंबर रोजी घोडबंदर रोडवरील गायमुख बस स्टॉप जवळ करण्यात आली. सदर ठिकाणी दोन व्यक्ती एमडी या अमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पथकाने सापळा कारवाई करून मोजीम अब्दुला शेख (४१, मीरा रोड) आणि तबरेज अब्दुल्ला शेख (५१, मिरारोड) या दोघांना ताब्यात घेतले.

यावेळी दोघांच्या ताब्यात असलेल्या स्कुटरच्या डिक्कीत तब्बल १ किलो ६७१ ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळून आले. ३ कोटी ३४ लाख २० हजार रुपये किमतीचे हे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला करण्यात आली. सदर ठिकाणी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या अब्दुल रेहमान मोइद्दीन कादर शेख (३३, गोवंडी, मुंबई) यास पोलीस पथकाने अटक करून त्याच्या ताब्यातून १ किलो १५२ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज साठा जप्त केला. त्याच्या चौकशीतून त्याने हे ड्रग्ज नवी मुंबईतल्या सिवूड येथे राहणाऱ्या आफ्रिदी मोहमद वली शेख (२७) याच्याकडून घेतले होते असे समोर आले. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यास देखील अटक केली.

२ किलो एमडी ड्रग्स जप्त

या दोन्ही कारवाईत एकूण चार तस्करांना अटक करण्यात येऊन तस्करांच्या ताब्यातून ५ कोटी ६६ लाख ३७ हजार रुपये किमतीचे २ किलो ८२३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथक करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT