भिवंडी : दारूचे व्यसन जडलेल्या दारुड्या पतीने पत्नीकडे भर चौकात दारूसाठी पैश्यांची मागणी करून पत्नीने त्यास नकार दिल्याच्या रागातून पत्नीला कटरने वार करून जखमी केल्याची घटना शांतीनगर परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी दारुड्या पतीच्या विरोधात पत्नीच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगिन्द्र चंदर कुमार (33) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीला दारूचे व्यसन जडल्याने 30 जुलै रोजी रात्री पाऊणे आठ वाजताच्या सुमारास त्याची पत्नी मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी जात असताना शांतीनगर परिसरातील चौकातील मंदिरा जवळ ती आली असता पतीने तिच्या पाठीमागून येऊ न दारूसाठी पैश्यांची मागणी केली.
त्यावेळी पत्नीने त्यास पैशांसाठी नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरून पतीनेे त्याच्याकडील पॅकेजिंगच्या कटरने पत्नीच्या गळ्याखाली वार करून तिला जखमी केले. तिच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पतीच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोह नाना रायते करीत आहेत.