डोंबिवली (ठाणे) : महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर उभे असलेले गड-किल्ले केवळ इतिहासाचे अवशेष नाहीत, तर महाराष्ट्राच्या शौर्य, संस्कृती आणि अभिमानाचे जिवंत प्रतीक आहेत. या किल्ल्यांचा इतिहास हा आपल्याला अभिमान वाटावा असा असून त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी देखील असल्याच्या जाणीवेतून डोंबिवलीकर तरूणांनी वसई जवळच्या मांडवीकोटवर जाऊन स्वच्छता मोहिम फत्ते केली.
डोंबिवलीतील ख्यातनाम संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रेक क्षितिज व किल्ले वसई मोहीम परिवाराने विरार तालुक्यातील मांडवीकोट स्वच्छतेसह दुर्गसंवर्धन मोहिम राबवली. या मोहिमेला श्रीदत्त राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या मोहिमेचे नेतृत्व ट्रेक क्षितिजचे शुभम सावंत यांनी केले. मोहिमेदरम्यान किल्ल्यावर साचलेले प्लास्टिक आणि कचरा उचलण्यात आला. तटबंदीवर वाढलेली झाडे आणि वेली काढण्यात आल्या. विशेषतः किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या बांबूच्या जाळीतून वाट मोकळी करण्यात आली, जे ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे होते. ट्रेक क्षितिजचे शुभम सावंत यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र गोवेकर, राहूल मेश्राम, कुशल देवळेकर, प्रशांत रांबाडे, निलेश गोरव, प्रिया कराडकर, प्राची कोकाटे, प्रणाली नारकर, स्वप्नाली सावंत, निरंजन साळुंखे, सोनाली मांजरेकर, अनुष्का पोवळे आदींनी ही मोहीम फत्ते केली.
दुर्ग हे आपल्या अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांचे जतन हे आपले कर्तव्य आहे. समाजात दुर्गप्रेम आणि इतिहासभान निर्माण करणे हेच ट्रेक क्षितिजचे ध्येय आहे. या मोहिमेत अनेक दुर्गप्रेमींनी सहभाग घेऊन मनापासून श्रमदान केले.शुभम सावंत, ट्रेक क्षितिज
विरार वसईहून वज्रेश्वरीकडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या मांडवी गावाजवळ मांडवीकोट किल्ला आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार नष्ट झाले आहे. उजव्या बाजूचा बुरूज कोसळून तेथे दगड-मातीचा ढिगारा तयार झालेला पहावयास मिळतो.
किल्ल्याच्या चारही कोपऱ्यांवरील बुरूज ढासळलेले दिसतात. या किल्ल्यावर येणाऱ्या अनेकांना भान नसते. प्लास्टिक, कचरा, घाण करून किल्ल्याचा परिसर विद्रूप करून टाकतात. मात्र अनेक दुर्गप्रेमी संस्थांचे स्वयंसेवक किल्ल्यावर जाऊन स्वच्छता अभियान राबवत असतात. डोंबिवलीतील ट्रेक क्षितिजसह किल्ले वसई मोहीम परिवाराने किल्ल्याच्या कानाकोपऱ्यात जमलेला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट देखील लावली.