Dombivli Stolen Mobile Returned
डोंबिवली : डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्याने हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढण्यात मोठे यश मिळविले आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये पोलिस ठाण्यात प्राप्त झालेल्या मोबाईल मिसिंग तसेच चोरी संदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने तपास पथकाने एकूण ३३ मोबाईल CEIR पोर्टलच्या माध्यमातून हस्तगत केले.
या हस्तगत केलेल्या मोबाईलचे वितरण स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी करण्यात आले. डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते मूळ मालकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आणि पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही संपूर्ण कामगिरी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने केली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवा. देविदास चौधरी, सुनील भणगे, नितीन सांगळे, निलेश पाटील आणि शिवाजी राठोड या कर्मचाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून तांत्रिक माहितीच्या आधारे हे मोबाईल शोधून काढले.
CEIR पोर्टलद्वारे चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल ब्लॉक करून त्यांचा शोध घेणे सध्या पोलिसांसाठी अत्यंत प्रभावी ठरत आहे. डोंबिवली पोलिसांनी अल्पावधीत ३३ मोबाईल हस्तगत करून दिलासा दिल्याने पोलिस दलावरील विश्वास अधिक दृढ झाल्याच्या भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.