Dombivli Girl Death Case
डोंबिवली : डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी लोकलच्या धडकेत झालेल्या अल्पवयीन तरूणीच्या मृत्यू प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. सुरूवातीला हा अपघात असल्याचे वाटत असताना तपासात ही जीवन संपविल्याची घटना असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. इतकेच नव्हे तर उत्तरीय तपासणी अहवालात तरूणी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरूणीच्या प्रियकराला बेड्या ठोकून गजाआड केले आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात एका अल्पवयीन तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी रेल्वे अपघात म्हणून लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांच्या जबाबानुसार आणि मोबाईलमधील माहितीच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान मृत तरूणीच्या मोबाईलमधील चॅटिंग आणि समाज माध्यमांवरील संभाषणाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यातून ती तरूणी राज पकड नावाच्या तरूणाच्या प्रेमात असल्याचे उघड झाले. दोघांची ओळख इंस्टाग्रामद्वारे झाली होती आणि नंतर दोघांमध्ये जवळीक वाढली होती.
पुढील तपासासाठी पाठवण्यात आलेल्या उत्तरीय तपासणी अहवालात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. अहवालानुसार मृत तरूणी तीन महिन्यांची गर्भवती होती. या सर्व बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी राज पकड याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने तरूणीशी असलेले प्रेमसंबंध आणि इतर माहिती मान्य केली. त्यानंतर पोलिसांनी राज पकड याच्यावर अटकेची कारवाई केली.
लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपासात आणखी काय माहिती समोर येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली परिसरात एकच खळबळ माजली आहे.