Dombivli Jewellers Shop Robbery AI Photo
ठाणे

Dombivli Gold Theft | डोंबिवलीत ज्वेलर्सच्या दुकानातील १६ लाखांच्या सोन्याच्या कॉईनसह बिहारी नोकरानी पसार

विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Jewellers Shop Robbery

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील महाराष्ट्र नगरात असलेल्या सोनाबाई चाळीतील मराठी मालकाच्या पेढीत काम करणाऱ्या मूळच्या बिहारी नोकरदार तरूणीने १६ लाख ५० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे २ कॉईन चोरून पळ काढला. हा प्रकार शनिवारी (दि.११) रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या संदर्भात भिवंडीतील कोनगाव परिसरात असलेल्या नारायण भोईर चाळीत राहणारे कल्पेश राजू घरत (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विष्णूनगर पोलिसांनी नेहा कुमारी गुप्ता (वय २४) हिच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

संशयित नेहा कुमारी ही भिवंडीतील कोनगाव परिसरात असलेल्या नाईकवाडीमध्ये राहत असली तरी ती मूळची बिहार राज्यातील आघीना सेवान गावची राहणारी आहे. कल्पेश घरत यांच्या मालकीची तनिष्क ज्वेलर्स नावाची पेढी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कल्पेश घरत हे सदर पेढी चालवत आहेत. या पेढीमध्ये नेहा कुमारी ही नोकरी करत होती. कल्पेश राहत असलेल्या परिसरातच राहणारी असल्याने तिच्यावर विश्वास बसला होता. मात्र, नोकरदार तरूणीने विश्वासघात केला.

शनिवारी रात्री ती अचानक बेपत्ता झाली. कल्पेश यांनी पेढीतील दागिन्यांची तपासणी केली असता ड्रॉव्हरमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवलेले १०० ग्रॅम वजनाचे ९९.९९ टक्के प्युरिटीचे २ सोन्याचे कॉईन गायब झाल्याचे लक्षात आले. कल्पेश यांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र कॉईन कुठेही आढळून आले नाहीत. त्यातच पेढीत काम करणारी नेहा कुमारी देखील बेपत्ता झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी देखील ती कामावर हजर झाली नाही. घरच्या पत्त्यावरही ती सापडली नाही. त्यामुळे नेहा कुमारी हिनेच १६ लाख ५० हजार रूपये किंमतीचे कॉईन चोरून नेल्याचा पेढीचे मालक कल्पेश यांचा संशय बळावला. त्यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात जाऊन तशी फिर्याद दाखल केली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तुळशीराम राठोड आणि त्यांचे सहकारी फरार नेहा कुमारीचा कसोशीने शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT