ठाणे जिल्ह्यातील पिंपळघर गावच्या डॉली देविदास पाटील हिने ट्रायथलॉन प्रकारात सुवर्णपदक मिळवले. pudhari news network
ठाणे

ठाणे : डॉली पाटीलला राष्ट्रीय ट्रायथलॉन क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

पुढारी वृत्तसेवा

किन्हवली : ठाणे जिल्ह्यातील पिंपळघर गावच्या डॉली देविदास पाटील या जलपरीने चेन्नई येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2024 या स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. डॉलीच्या या यशाने ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला असून तिच्यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी 36 किमीची धरमतर खाडी साडेनऊ तासांत पोहून पार करणारी, बांगलादेशातील बांगला चॅनलचा 17 किमीचा प्रवास 4 तास 12 मिनिटांत पोहून पूर्ण करणारी व 2023 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ट्रायथलॉन स्पर्धेत सहभागी झालेली ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या पिंपळघर गावची कन्या डॉली देविदास पाटील हिने चेन्नईत सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रविवारी (दि.15) सुवर्णपदकाला गवसणी घातली

ट्रायथलॉन या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना 700 मीटर स्विमिंग, 20 किमी सायकलिंग व 5 किमी रनिंग करत तिने हे गोल्ड मेडल मिळवले.या यशामुळे तिची 7 व 9 नोव्हेंबर 2024 रोजी सौदी अरेबियात होणा-या साऊथ एशियन गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

यापूर्वी जून 2024 मध्ये गोवा राज्यात झालेल्या स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवून पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डॉलीने सहभाग घेतला होता. कोच बालाजी केंद्रे यांचे मार्गदर्शन, वडील देविदास पाटील यांची प्रेरणा, शिवसेना नेते प्रकाश पाटील यांचा भक्कम पाठिंबा आणि सरावातील सातत्य याच्या जोरावर हे यश मिळवल्याची प्रतिक्रिया डॉली पाटील हिने दै. पुढारीशी बोलताना दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT