५०० कोटींच्या ठेक्याचे आमिष दाखवून डॉक्टरला २.२४ कोटींचा गंडा pudhari photo
ठाणे

Thane Crime : ५०० कोटींच्या ठेक्याचे आमिष दाखवून डॉक्टरला २.२४ कोटींचा गंडा

कूण २ कोटी ८ लाखांची रोकड आव्हाड पिता-पुत्रांकडे दिल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ५०० कोटीच्या खाणकामाच्या काँट्रॅक्ट मिळवून देण्याचे अमिष दाखवून बनावट पत्रे दाखवून विश्वास संपादन करीत चक्क डॉक्टरला ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल २ कोटी २४ लाख रुपये वेळोवेळी उकळल्याची घटना २०२५ साली घडली. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात संजीव शंकर आव्हाड आणि शुभम संजीव आव्हाड यांच्यासह तपासात निष्पन्न होणाऱ्या इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉक्टरांनी तक्रारीत केली आहे.

तक्रारदार डॉ. अमोल घुले हे पत्नीसमवेत कॅसलमिल परिसरात रुग्णालय चालवतात. तसेच ते भाऊ डॉ. राहुल घुले यांच्यासोबत ‘कमल लाईफस्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचा व्यवसाय करतात. व्यावसायिक संबंधातून त्यांची फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये संजीव आव्हाड यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर आव्हाड कुटुंबीयांनी घुले कुटुंबाशी सलगी वाढवून कौटुंबिक संबंध निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हा ठेका मिळवून देण्यासाठी केंद्रीय खाणकाम मंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवावे लागतील, असे सांगून सुरुवातीला २ कोटी ८ लाख रुपये रोख मागण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार घुले यांनी २८ व २९ मार्च २०२५ रोजी प्रत्येकी एक कोटी आणि २ जून रोजी आठ लाख रुपये, अशी एकूण २ कोटी ८ लाखांची रोकड आव्हाड पिता-पुत्रांकडे दिल्याचा दावा तक्रारीत केला आहे.

तक्रारदार यांचा विश्वास बसावा म्हणून रुंगटा कंपनीच्या नावाने विविध पत्रे व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आली. त्यात ‘कन्फर्मेशन लेटर’, ‘लेटर ऑफ इंटेंट’, ‘व्हेंडर कोड’ आणि बैठकीसंदर्भातील पत्रांचा समावेश होता. मात्र ठेका मिळाला नाही. डिसेंबर २०२५ मध्ये आणखी १६ लाख रुपये भरल्यास ठेका मिळेल, असे सांगण्यात आल्याचा आरोप आहे.

त्यानुसार घुले यांनी पाच लाख रुपये एका व्यक्तीच्या खात्यावर, तर ११ लाख रुपये संजीव आव्हाड यांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे पाठविले. अशा प्रकारे एकूण २ कोटी २४ लाख रुपये दिल्यानंतरही ठेका मिळाला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT