आमदार राजू पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.  (छाया : बजरंग वाळूंज)
ठाणे

ठाणे : 27 गावांसह शहरवासियांना पथदिव्यांची दिवाळी भेट

23 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : गेल्या चार वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने सेवा-सुविधांसह विकास कामे रखडली होती. तथापी मनसेचे शक्तिशाली नेते तथा आमदार राजू पाटील यांनी तगादा लावल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या 27 गावांसह लगतच्या शहरी भागाचा सर्वांगीण विकास होण्याकरिता कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून काँक्रिट रस्त्यांसह 27 गावांना लखलखणाऱ्या पथदिव्यांची दिवाळी भेट देणाऱ्या दिलदार आमदाराची कामगिरी दमदार असल्याची भावना 23 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन सोहळ्यादरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी अशा प्रतिक्रिया दिल्या.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांसह इतर 8 प्रभागांत मागणी असलेल्या ठिकाणी पथदिवे बसविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 27 गावांतील रस्त्यांच्या बांधकामांसाठी तगडा निधी खेचून आणणाऱ्या मनसेचे नेते तथा स्थानिक आमदार राजू पाटील यांनी गावांतील रस्त्यांच्या दुतर्फा पथदिवे बसविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शासनाच्या नगरविकास विभागाकडून 27 कोटी 90 लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्याने 27 गावांसह शहरी भागातील रस्ते व परिसर येत्या दिवाळीपर्यंत लखलखणार आहे. या कामाचा शुभारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर भूमिपूजनाने करण्यात आला. डोंबिवली जवळच्या भोपर गावात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरूण जांभळे, उपशहराध्यक्ष प्रभाकर जाधव, विभागाध्यक्ष रोहित भोईर, भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष संदीप माळी, प्रसाद माळी, अमर माळी, यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, राजसैनिक आणि भोपर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूमिपूजन सोहळा

निळजे हेवन येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहासाठी विशेष निधीतून मंजूर झालेल्या 50 लाख रूपये निधीच्या कामासह गटारे व पायवाटांसाठी मंजूर झालेल्या 6 कोटी रूपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पिसवलीतील देशमुख होम्स परिसरातले रस्ते आणि पायवाटा कामांचा शुभारंभ करण्यात आला. या भागातील रस्त्यांचा कायापालट व्हावा, याकरिता विशेष निधीतून 3 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शुभारंभ करताना आमदार राजू पाटील यांनी उपस्थित स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर संवाद साधत त्यांच्या अडचणी मार्गी लावण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी केडीएमसीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, राजसैनिक, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासकीय राजवटीमुळे विकासकामे ठप्प

नगरसेवक नसल्याने 4 वर्षांपासून केडीएमसीवर प्रशासकीय राजवट आहे. प्रशासक असल्यामुळे पाहिजे तशी विकास कामे होताना दिसत नाहीत. दिवाबत्ती, अंतर्गत रस्ते, पायवाटा, गटारे, आदी कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 70 ते 80 कोटींची मागणी केली आहे. हा निधीही लवकरच प्रत्यक्षात येईल. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाईट प्रवृत्तींवर मात करून चांगल्या कर्माची सुरूवात होते. मनसे सदैव नागरिकांच्या सोबत खंबीर उभी असल्याची भावना आमदार राजू पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

गावांसह शहरी भागात 4.679 हजार पथदिव्यांचे पोल

27 गावांतील मुख्य व अंतर्गत अशा एकूण 207 रस्त्यांवर पथदिवे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये 4 हजार 679 पथदिव्यांचे पोल उभे करण्यात येणार आहे. कल्याण पूर्व आय-9 प्रभाग क्षेत्रात असलेल्या नांदिवली, वसार, माणेरे, भाल, पिसवली, चिंचपाडा, आशेळे, आडिवली-ढोकळी, डोंबिवली पूर्वेकडील ई - 10 प्रभाग क्षेत्रात असलेल्या भोपर, कोपर, देसलेपाडा, लोढा-हेरीटेज, संदप, उसरघर, मानपाडेश्वर मंदिर, संदप, रिजन्सी, घारीवली, काटई, आयरेगाव, मानपाडा रोड, उंबार्ली, पाईपलाईन रोड, कोळेगाव, हेदुटणे, घेसर, निळजेगाव, सोनारपाडा, सांगाव, सांगर्ली, देसलेपाडा, नांदिवली, मिलापनगर आणि आजदेगाव परिसरात अंतर्गत रस्त्यांवर एलईडी बल्बचे पथदिवे बसविण्याच्या कामाला आता सुरूवात होणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT