Diva City Fire Rescue Vehicle Shortage Pudhari
ठाणे

Diva Fire Rescue Vehicle | दिवा शहरात मोठ्या अग्निशमन वाहनाचा अभाव; खर्डी अग्निशमन केंद्रात केवळ रिस्क्यू वाहन

पाच लाख नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

Diva City Fire Rescue Vehicle Shortage

आरती परब

दिवा : दिवा शहराची लोकसंख्या पाच लाखांच्या पुढे गेली असून, गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर उंच इमारती आणि गृहनिर्माण संकुले उभी राहिली आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अग्निशमन यंत्रणा अद्यापही अपुरी असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पूर्वी दिवा शहर आणि ग्रामीण भागातील आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शीळ येथील अग्निशमन केंद्रावर होती. घटनास्थळी पोहोचण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन खर्डी येथे नवीन अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, या केंद्रात मोठे  अग्निशमन वाहन नसून केवळ रिस्क्यू वाहन उपलब्ध आहे. या वाहनात अवघे ५०० लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे, तर नियमित मोठ्या अग्निशमन वाहनामध्ये १० हजार लिटर पाणी असते.

खर्डी अग्निशमन केंद्रावर खर्डी, दिवा गावं, डावले, फडकेपाडा, आगासन, साबे, दातिवली, बेतवडे, मुंब्रा कॉलनी, गणेशनगर, विकास म्हात्रे गेट नगर, बी.आर. नगर, जीवदानी नगर आदी दहांपेक्षा अधिक परिसरांची जबाबदारी आहे. या भागात गेल्या काही महिन्यांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, शिळफाटा परिसरातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडीमुळे मोठे अग्निशमन वाहन वेळेत घटनास्थळी पोहोचत नसल्याची समस्या नागरिकांनी मांडली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिव्यातील सुमारे ८० टक्के वस्त्या दाटीवाटीच्या असून अनेक ठिकाणी उंच इमारती उभारण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आग लागल्यास ५०० लिटर पाणी काही मिनिटांतच संपते. त्यानंतर मोठ्या अग्निशमन वाहनची प्रतीक्षा करावी लागते आणि तोपर्यंत आगीचा भडका वाढून मोठ्या प्रमाणात वित्तहानी होण्याबरोबरच जीवितहानीचाही धोका निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७, २८ आणि २९ मधील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न ठाणे महापालिकेच्या महासभेत मांडून खर्डी अग्निशमन केंद्रासाठी तातडीने १० हजार लिटर क्षमतेचे मोठे अग्निशमन वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

यासाठी समाजसेवक विनोद वास्कर आणि दिवेकर यांनीही आवाज उठवला असून, दुर्घटना घडल्यानंतर मदतीची घोषणा करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खर्डी केंद्रात मोठे अग्निशमन वाहन उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाणे महानगरपालिकेने या मागणीची तातडीने दखल घेऊन खर्डी अग्निशमन केंद्राची क्षमता वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT