ठाणे : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, २७ जून रोजी मतदान होणार आहे. २८ जून रोजी मतमोजणी होऊन बँकेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होईल.
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. या बँकेचे ४,०२७ मतदार आहेत. निवडणुकीद्वारे निवडून द्यावयाचे एकूण २१ संचालक खालीलप्रमाणे आहेत:
तालुका प्रतिनिधी : प्रत्येक तालुक्यातून एक असे एकूण १४ संचालक.
इतर प्रतिनिधी : पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थेतून १ संचालक.
संस्था व विशेष प्रतिनिधी : खरेदी-विक्री संस्था, मच्छिमार सहकारी संस्था, जंगल कामगार सहकारी संस्था, दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मिळून १ संचालक.
आरक्षित प्रवर्ग : महिला प्रतिनिधी २, अनुसूचित जाती/जमाती १, एनटी/व्हीजेएनटी १, ओबीसी १.
इतर : खरेदी-विक्री संघ, प्रक्रिया संस्था, ग्राहक संस्था, गृहनिर्माण संस्था, व्यक्तिगत भागधारक, स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वजनिक विश्वस्त संस्था यांतून १ संचालक.
बँकेचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार, आजपासून १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २ जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर ३ जून ते १७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. १८ जून रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हे वाटप केल्यानंतर २७ जून रोजी मतदान होईल.
सलग दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालकपद भूषविणाऱ्या संचालकांना अपात्र ठरविण्यात आल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यमान उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी आमदार अमित घोडा, नागेश पाटील, निवृत्ती घुसेकर, दासू रेडी आणि नीता कांबळी यांसारख्या जुन्या संचालकांना पुन्हा संधी मिळते, की सभासद पूर्णपणे नवीन उमेदवारांच्या हाती बँकेची धुरा सोपवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०२१ च्या निवडणुकीत 'सहकार पॅनल'चे १८ उमेदवार (बहुजन विकास आघाडी ९, भाजप ७ व अन्य २) विजयी झाले होते, तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बदललेल्या राजकीय वातावरणामुळे भाजपचे वर्चस्व वाढलेले दिसत असले तरी, नवीन अध्यक्ष कोणत्या विचारधारेचा असेल, हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे सध्याचे चित्र आहे.