Thane district bank 
ठाणे

Thane district bank | ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये पडली उभी फूट 

परिवर्तन पॅनल विरोधात सर्व पक्षीय पॅनल ? 

पुढारी वृत्तसेवा

ठाणे  : ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (टीडीसीसी) निवडणुकीत आता चांगलेच रंग भरू लागले असून कोण कुणाच्या पॅनलमधून निवडणूक लढविणार याचा तिढा वाढू लागला आहे. भाजपचे माजी राज्य मंत्री कपिल पाटील यांनी महायुतीच्या  परिवर्तन पॅनलमधील उमेदवारांची यादी जाहीर केली.  त्यामुळे महायुतीत फूट पडली असून भाजप - शिवसेनेचा दुसरा गट बहुजन विकास आघाडीच्या पॅनलमधून निवडणूक लढवणार असल्याने चुरस निर्माण झाली आहे. 

ठाणे जिल्हा बँकेची २७ जून रोजी निवडणूक होणार असून २१ पैकी ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १२ जागांपैकी महायुतीतर्फे जिल्हा स्तरावरील ४ जागा भाजपा व ३ जागा शिवसेना लढवित असल्याचे परिवर्तन पॅनलचे प्रमुख कपिल पाटील यांनी जाहीर केले आहे. यावेळी शिवसेनेतर्फे बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील उपस्थित होते. मात्र शिवसेनेचा कोणी ही नेता उपस्थित नव्हता.

त्यामध्ये भाजपतर्फे अनुसुचित जाती किंवा अनुसुचित जमातीतील मतदारसंघातून माजी आमदार पांडुरंग बरोरा, खरेदी विक्री संघ प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था मतदारसंघात नगरसेवक सिताराम राणे, महिला राखीव मतदारसंघात दिपाली पाटील, इतर मागासवर्ग मतदारसंघात हार्दिक राऊत, तर शिवसेनेतर्फे पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी संस्था व नागरी बँक मतदारसंघात प्रभू गोविंद पाटील, महिला मतदारसंघात सुवर्णा पावशे, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग मतदारसंघात राजेंद्र घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्हास्तरीय जागा फक्त पॅनलमधून लढल्या जाणार असून उर्वरित तालुका स्तरातील जागांचा यात समावेश नसल्याचे शिवसेनेचे बाबाजी पाटील यांनी सांगितले. हे उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी चर्चा करून जाहीर करण्यात आल्याचे ही पाटील यांनी सांगितले आहे. 

   दुसरीकडे भाजपचे आमदार किसन कथोरे गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही माजी संचालकांनी बहुजन विकास आघाडीच्या पॅनलमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये माजी उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे याचे पुत्र विशाल कुऱ्हाडे, सेनेचे अनिल मुंबईकर यांचे सुपुत्र स्वप्नील मुंबईकर यांचा समावेश आहे. तर महायुतीतर्फे माजी राज्य मंत्री कपिल पाटील यांनी जाहीर केलेले उमेदवार हे अधिकृत आहेत की नाही याची मला कल्पना नसून दिल्लीवरून शिंदे हे आल्यानंतर अंतिम निर्णय घेतील आणि त्याच्या आदेशानुसार निवडणूक लढविली जाईल, असे शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांनी सांगितले.  

तालुका स्तरावरील ५ जागांमध्ये जव्हारमध्ये ज्योती पटेकर, बळवंत शंकर गावित, मोखाडा  भिका माळी, सुनील भुसारा, पालघरातून अनिल गावंड, उत्तम पाटील , नागेश पाटील, अरविंद कवळी, शहापूर मतदार संघात  प्रकाश वरकुटे, अरुण पानसरे , अनिल निचिते , सुभाष हरड  आणि विक्रमगड तालुक्यासाठी सुनील पाटील, निलेश सांबरे, संदीप पावडे यांच्यात लढत होईल. महायुतीचा परिवर्तन पॅनल  जाहीर झाले असून माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार किसन कथोरे यांचा पॅनल अद्याप जाहीर झाला नसून त्यासंदर्भात खलबते सुरु आहेत.  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १७ जुन असून त्या दिवशी दुसरा पॅनल स्पष्ट होईल.    

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT