Thane school buildings Pudhari
ठाणे

Thane school buildings: ठाणे जिल्ह्यातील शाळांची धक्कादायक स्थिती! २६४ इमारती धोकादायक

शहापूर, मुरबाडमधील शाळांची अवस्था चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

श्रद्धा कांदळकर

ठाणे: कुठे वर्गखोल्यांच्या छताला गळती, कुठे भिंतींना मोठे तडे, तर कुठे मोडकळीस आलेल्या इमारतींच्या छायेत सुरू असलेले शिक्षण... अशा धोकादायक परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील १ हजार ३२५ शाळांच्या एकूण २ हजार ८३९ इमारती आहेत. यापैकी २६४ इमारती धोकादायक स्थितीत असून, ७२५ इमारतींना मोठ्या, तर ५२१ इमारतींना किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे.

पावसाळ्यात गळणारी छते आणि कमकुवत झालेल्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर सुरक्षित छत आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळांच्या इमारतींची दुरवस्था दूर करण्याऐवजी विद्यार्थ्यांना अशा वातावरणात शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालक आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शाळेची इमारत ही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची मूलभूत सुविधा असली, तरी अनेक ठिकाणी तिचीच सुरक्षितता धोक्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची तालुकानिहाय आकडेवारी पाहता मुरबाडमध्ये ११३ इमारती धोकादायक आहेत, तर तब्बल २४६ इमारतींना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे.

शहापूरमध्ये २० धोकादायक असून, १८० इमारतींना मोठ्या आणि २८५ इमारतींना किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे.

भिवंडीतील ५३, कल्याणमधील ७२ आणि अंबरनाथमधील सहा इमारती धोकादायक श्रेणीत आहेत. या परिस्थितीत इमारतींच्या दुरुस्तीचा प्रश्न केवळ प्रशासकीय कामापुरता मर्यादित राहिलेला नसून, विद्यार्थ्यांच्या रोजच्या शिक्षणाशी आणि सुरक्षिततेशी थेट जोडला गेला आहे.

शाळांच्या इमारतींच्या दुरवस्थेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रत्यक्षपणे होत आहे. छत गळत असल्याने पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये पाणी साचते, तर भिंतींना तडे गेल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसताना भीतीचा सामना करावा लागतो. कुठे संरक्षक भिंत नाही तर कुठे स्वच्छतागृहे मोडकळीस आलेली आहेत.

काही ठिकाणी वर्गखोल्यांची स्थिती इतकी बिकट आहे की नियमित अध्यापनासाठी उपलब्ध जागेचा वापर करताना अडचणी निर्माण होतात. परिणामी, विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण मिळत नाही.

विशेषतः ग्रामीण भागात पर्यायी वर्गखोल्या किंवा जवळच्या शाळेत जाण्याची सोय मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आधीच जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या घटत असताना, इमारतींची दुरवस्था पालकांचा शाळांवरील विश्वास कमी करणारी ठरत आहे.

दरम्यान, धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी, नवीन वर्गखोल्यांची उभारणी, मोठ्या दुरुस्त्या, संरक्षक भिंती, स्वच्छतागृहे आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्हा वार्षिक नियोजन योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतून ही कामे करण्यात येणार आहेत. यंदा सुमारे १३ कोटी रुपये खर्चून नवीन वर्गखोल्यांची कामे करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

शहापूरमध्ये ४८५ इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

आदिवासीबहुल आणि पेसा अंतर्गत असलेल्या शहापूर तालुक्यातील शाळांच्या इमारतींची स्थिती विशेष चिंताजनक आहे. तालुक्यातशाळांच्या २० इमारती धोकादायक आहेत. याशिवाय १८० इमारतींना मोठ्या, तर २८५ इमारतींना किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. म्हणजेच, एकूण ४८५ इमारतींना दुरुस्तीची गरज असून, तालुक्यातील शालेय पायाभूत सुविधांसमोरील आव्हानाची व्याप्ती मोठी आहे.

दुर्गम आणि आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांसाठी शाळा ही शिक्षणाची प्रमुख सुविधा असते. अशा वेळी शाळेची इमारतच असुरक्षित असेल, तर विद्यार्थ्यांना सुरक्षित शिक्षणाची हमी कशी मिळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT