डोंबिवली : प्रसूतीनंतर चार वेळा मुल दगावल्याने आलेल्या नैराश्यातून 29 वर्षाच्या विवाहितेने गळफास लावून आपले जीवन संपुष्टात आणले. कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या दावडी गावातील समर्थनगरमध्ये राहणाऱ्या विवाहितेचा मृतदेह राहत्या घरातील छताला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला. मंगळवारी (दि.4) सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या विवाहितेचा पती नोकरी करतो. या महिलेचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते. गेल्या तीन-चार वर्षांत या विवाहितेला गरोदरपणात चार वेळा मुले झाली. प्रसूतीनंतर या चारही मुलांचा मृत्यू झाला. एकीकडे मुलांचा मृत्यू, तर दुसरीकडे मूलबाळ नसल्याने विवाहितेला चिंतेने ग्रासले होते. त्यातच तिला नैराश्य आले होते. पतीने तिला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या मनातून विचार जात नव्हते. जन्माला आलेले बाळ दगावत असल्याचा विचार सतत मनात सलत असल्याने ही विवाहिता नैराश्याच्या गर्तेत गेली. तिच्यावर वैद्यकीय उपचार देखिल सुरू होते. मंगळवारी (दि.4) सकाळी पती कामावर निघून गेल्यानंतर विवाहितेने किचनमधील छताच्या हुकला साडीने गळफास घेतला. घरात कुणाचेही येणे-जाणे नसल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत या विवाहितेचा मृतदेह तसाच होता.
मंगळवारी (दि.4) संध्याकाळी साडेसात वाजता या विवाहितेचा पती घरी आला. त्यावेळी त्याने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने घरात पाहिले असता पत्नीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला. या घटनेची माहिती कळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे पाठवून दिला आहे. पत्नीच्या मृत्यू संदर्भात आपली कुणाबद्दल कसलीही तक्रार नसल्याचे पतीने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या नोंदीत म्हटले आहे. या संदर्भात सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड अधिक तपास करत आहेत.