crime Pudhari Photo
ठाणे

ठाणे: लग्नास विरोध केल्याने मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : लग्नास विरोध केल्यास मुलीच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या भिवंडीतील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करत तरुणीची बदनामी

"तुम्ही तुमच्या मुलीचे माझ्या बरोबर लग्न लावून दिले नाही. मुलीच्या लग्नाला विरोध केला तर तुम्हाला जीवे ठार मारीन," अशी धमकी एका तरुणाने कल्याण पूर्वेकडील एका महिलेला दिली आहे. या धमकीने या मुलीच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भयभीत झालेल्या कुटुंबातील महिलेने याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भिवंडीतील परिसरात राहणारा आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत हा सारा प्रकार तक्रारदार महिलेच्या महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या मुलीच्या बाबतीत घडला आहे. पीडित मुलगी आणि आरोपी तरुण एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. ते एकमेकांना ओळखतात. परिचयातून पीडित मुलगी आणि आरोपी तरुण यांची मैत्री झाली. आरोपीने पीडित तरुणीसोबत काही फोटो काढले होते. कुटुंबीयांविरुद्ध आपण काहीही करणार नाही, असे सांगून पीडित तरुणीने त्याच्याशी असलेले संबंध तोडले होते. तरीही पीडित तरुणी महाविद्यालयाकडे रस्त्यावरून जात असताना तिचा पाठलाग करून आरोपी तिला भेटण्याचा प्रयत्न करत असे. पीडित तरुणीने त्याला भेटण्यास नकार दिल्याच्या रागाने तिच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करत तरुणीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

फोटोच्या माध्यमातून बदनाम करण्याचा आरोपीचा प्रयत्न असल्याचे पीडित तरुणीला समजल्यावर तिने हा प्रकार घरात सांगितला. या प्रकाराने तरुणीची आई संतप्त झाली. तरीही आरोपीने पीडित तरुणीच्या आईची भेट घेतली. तुमच्या मुलीचे लग्न माझ्या बरोबर लावून दिले नाहीतर मी तुम्हाला जीवे ठार मारीन आणि तुमच्या मुलीला पळवून नेईन, अशी धमकी दिली.

कुटुंबामध्ये भितीचे वातावरण

या प्रकारामुळे पीडित तरुणीचे कुटुंब भीतीने हादरले आहे. दरम्यान तरुण टोकाची कोणतीही भूमिका घेऊ शकतो, हे समजल्यानंतर पीडितेच्या आईने शनिवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या सूचनांनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT