ठाणे : 'पुढारी'ने श्री मलंगगड परिसरासह ठाणे जिल्ह्यातील धोकादायक धबधबे, नदीपात्रे आणि पर्यटनस्थळांवर पर्यटक जीव धोक्यात घालून वावरत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी आणि भारतीय हवामान विभागाने दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व धबधबे, गडकिल्ले, धरणे, तलाव, नद्या तसेच अन्य पर्यटनस्थळांवर पुढील आदेशापर्यंत नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.
'पुढारी'ने श्री मलंगगड परिसरातील धोकादायक नदीपात्र, धबधबे आणि कड्यांवर सुरू असलेल्या जीवघेण्या पर्यटनाची वस्तुस्थिती प्रभावीपणे मांडली होती. पावसाळ्यात या ठिकाणी वाढणारी पर्यटकांची गर्दी, रिल्स आणि सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालणारे तरुण, तसेच संभाव्य दुर्घटनांचा वाढता धोका याकडे वृत्तातून लक्ष वेधण्यात आले होते. अशा परिस्थितीत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली होती.
या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत आदेश जारी केला आहे. त्यानुसार संबंधित सर्व विभागांना पर्यटनस्थळांवर बॅरिकेडिंग करणे, धोक्याबाबतचे सूचना फलक लावणे, तसेच नागरिकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात दरवर्षी नदीपात्रात वाहून जाणे, धबधब्यांमध्ये बुडणे, निसरड्या कड्यांवरून घसरून पडणे अशा दुर्घटनांमध्ये जीवितहानी होत असते. या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह मानला जात आहे. नागरिकांनीही आदेशाचे पालन करून स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.