मुरबाड : मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे येथील शेतकर्याच्या भातपिकाचे रान डुकरांनी मोठ्याप्रमाणात नुकसान केल्याची घटना घडली आहे. या भातपिक नुकसानीच्या प्रकारामुळे पीडित शेतकरी हवालदिल झाला आहे. अशाच प्रकारे अनेक शेतकर्यांचे यापुर्वी रानडुकरांनी पिकांचे नुकसान केले आहे.अशा प्रकारच्या नुकासानी टाळण्यासाठी शेतकरी आपल्या परीने अनेक प्रयत्न करत असतात. मात्र नुकसानग्रस्त पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
तुकाराम जगन खुणे असे पीडित शेतकर्याचे नाव असून खुणे यांनी 20 गुंठ्यांत भातपिकाची लागवड केली होती. मात्र रात्रीच्या सुमारास रान डुकरांनी शेतात हैदोस माजवून अवघा हातातोंडाशी आलेला पीक मातीमोल केला आहे. सकाळी भात कापणीसाठी शेतात आले असता शेतातील दृश्य पाहून खुणे कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. आधीच अस्मानी संकटाला तोंड देत असतांना त्यात वन्य प्राण्यांच्या अशा हैदोसामुळे शेती व्यवसायावर मोठी अवकळा आल्याचे चित्र मुरबाड तालुक्यात पाहायला मिळत आहे.
तर वन विभागाने या रान डुक्करांचा बंदोबस्त करावा तसेच संबंधित प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पीडित शेतकरी कुटुंबाने केली आहे.