ठाणे महानगरपालिका file photo
ठाणे

ठाणे : ठाणे मनपाचा डायघर प्रकल्प चार दिवसांपासून बंद; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : ठाण्याच्या कचर्‍याचे डोंगर निर्माण करण्यात येणार्‍या डायघर प्रकल्पात चार दिवसांपासून वाहनांना प्रवेश दिला जात नाही. प्रकल्पात कचरा टाकण्यासाठी येणारी वाहने दिवसभर थांबून पुन्हा परतीचा मार्ग निवडत आहेत. दिवसभर कचर्‍याची वाहने रस्त्याच्या कडेला असल्याने शुक्रवारी (दि.27) डायघर पंचक्रोशी समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी दुर्गंधी पसरविणार्‍या कचर्‍याची वाहने पुन्हा ठाण्यात पाठवून दिली आहेत. त्यामुळे चार दिवस प्रकल्प बंद असल्याने डायघर परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य वाढले आहे.

कचर्‍यापासून डायघरमध्ये वीज निर्मिती सुरू करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात कोणत्याही वीज निर्मिती न करता कचर्‍याचे डोंगर तयार करून दुर्गंधी तयार केली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनांना पुन्हा परतावे लागत असल्याने दुर्गंधी परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रकल्प परिसरात कचर्‍याचे डोंगर उभे राहणार आहेत. डायघर प्रकल्पातील या कारभारावर ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अशोक शिनगारे यांनीही तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान या प्रकल्पातील कचर्‍याची तातडीने योग्य रित्या विल्हेवाट लावून डायघर परिसर दुर्गंधीमुक्त करण्याची सूचना ठाणे मनपाच्या अधिकार्‍यांना दिल्या होत्या. मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला देखील फेटाळून लावत ठाणे मनपाने आपला अनागोंदी कारभार सुरू ठेवल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कचर्‍याला लाल सिग्नल

डायघर प्रकल्पात कचर्‍याच्या गाड्या बंद केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शनिवार (दि.28) रोजी ठाणे मनपाचे घनकचरा उपायुक्त मनीष जोशी आणि दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुड्डे हे प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता कचर्‍याची वाहने परतीच्या मार्गाला लागलेली पाहता कचर्‍याला लाल सिग्नल मिळाल्याच्या चर्चा आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT