सर्च ऑपरेशन pudhari file photo
ठाणे

ठाणे : संशयीत बोटीमुळे डहाणूकर भयभीत; किनारपट्टीवर सर्च ऑपरेशन

पुढारी वृत्तसेवा

पालघर/बोर्डी : डहाणू तालुक्याच्या समुद्रकिनारी संशयित हालचाली करणारी बोट आढळून आल्याने किनारपट्टी भागात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ही संशयित बोट शोधण्यासाठी व तो प्रकार जाणून घेण्यासाठी पोलीस प्रशासन व्यस्त असून या प्रकारामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. संशयित हालचाली झालेल्या या बोटीमुळे समुद्री सुरक्षेसह इतर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

डहाणू तालुक्यातील घोलवड पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या चीखले वडकती पाडा गावासमोर गुरुवारी ही संशयित बोट तीन नागरिकांना समुद्रामध्ये पाहिली. वडकती पाडा गावासमोर असलेल्या समुद्रकिनारी क्रिकेट मैदान परिसरातील कठड्यावर या गावातील प्रथमेश जोंधळेकर, सुजित जोंधळेकर व उमेश जोंधळेकर हे तिघेजण मध्यरात्रीच्या सुमारास मोबाईलवर गेम खेळत बसले होते. यादरम्यान समुद्रामध्ये उभ्या असलेल्या मासेमारी बोटिंजवळ ही संशयित बोट त्यांना दिसून आली. या तीन नागरिकांना दिसलेली ही संशयित बोट या भागातील बोटीपेक्षा वेगळी व मोठी अशी ही बोट होती. या बोटीमध्ये हिरव्या पांढर्‍या रंगाचा लख्ख प्रकाश पडणारे विजेचे दिवे होते. ही बोट पुढच्या बाजूने टोक उंच असलेली होती तर मागच्या बाजूला केबिन होती. ती पुढे येऊन नंतर पुन्हा या भागातून निघून गेली.

घडलेला हा प्रकार व ही माहिती तातडीने पोलिसांना समजली. पोलिसांनी याप्रकरणी संशयित बोटीचा तपास सुरू केला असून समुद्रकिनार्‍याशी संबंधित सर्व यंत्रणांना याबाबत बिनतारी संदेश पाठवून सतर्क करण्यात आले आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणार्‍या मच्छीमारांनी अशा हालचाली असलेल्या बोटी पाहिल्यास सुरक्षा यंत्रणांना तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा सुरक्षा शाखेने केले आहे. या बोटीबाबत पोलिसांना ठोस माहिती अजूनही प्राप्त झाली नसून पोलीस यंत्रणा या प्रकाराचा मागोवा घेत आहे.

बोटीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क

समुद्रात आढळलेल्या संशयास्पद हालचाली करणार्‍या व वेगळ्या दिसणार्‍या या बोटीबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असून किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने जोरदार चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरू आहे. या प्रकारांमुळे गावांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले आहे.

पोलीस, सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क

26/11 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट व इतर घटनांमधील प्रमुख दहशतवादी हे पाकिस्तानमार्गे समुद्री भागातून याच हद्दीमधून मुंबई येथे बोटीने पोहोचले होते. त्यामुळे त्यानंतर पोलीस यंत्रणा व सागरी सुरक्षा यंत्रणा आणखीन सतर्क झाल्या होत्या. किनारी पोलीस ठाण्यांमध्ये असे प्रकार घडू नयेत किंवा संशयस्पद हालचाली होऊ नयेत म्हणून गस्ती बोटी आहेत. मात्र अचानक आलेल्या या बोटिमुळे पुन्हा एकदा सागरी व इतर सुरक्षेचा मुद्दा डोके वर काढू लागला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT