डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये गेल्या चार दिवसांत बारा बारवर बुलडोझर फिरवून भूईसपाट करण्यात आले. यावेळी हुक्का पार्लर, पानटपर्या ढाब्यांवर कारवाई करण्यात आली. युवा पिढीचे जीवनमान उद्ध्वस्त करू पाहणार्या संस्कृतीला मुठमाती देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशांना प्रमाण मानून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने प्रत्येक प्रभाग क्षेत्रांतील बेकायदा पद्धतीने उभारलेल्या बार आणि ढाब्यांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई शनिवारी-रविवारी (दि. २९ व ३० जून) सुट्टीच्या दिवशीही भर पावसात सुरू केली. विशेष म्हणजे आपापल्या अस्थापनांवरील कारवाया थांबविण्यासाठी येणार्या राजकीय नेत्यांच्या दबावाकडे दुर्लक्ष करून केडीएमसीने कारवायांचा वेग अधिक वाढविल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशांप्रमाणे केडीएमसी हद्दीतील बेकायदा हॉटेल्स, बारसह शाळा-कॉलेज परिसरातील टपर्या, पब्ज, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात येत असून या आस्थापना पुन्हा सुरू होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल.डॉ. इंदूराणी जाखड, आयुक्त
चार दिवस सुरू असलेल्या कारवाईत कल्याण -डोंबिवलीतील 12 'बार' वर तोडक कारवाई करण्यात केली. डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या कल्याण रोडला असलेल्या शेलार नाक्यासमोरील 'शिल्पा बार'ला '6/फ' प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी नेस्तनाबूत केले. तळ + 2 मजली असलेला हा बार गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासनाला आव्हान देत होता. या बारच्या तळ मजल्यावर देशी दारू तर वरच्या मजल्यांवर विदेशी दारू ढोसण्यासाठी गर्दी होत असे. मद्यपींमध्ये वाद, भांडणे, वेळप्रसंगी हाणामार्या होत असत. त्यामुळे हा 'बार' सरकारच्या रडारवर आला होता. अखेर 'केडीएमसी'ने पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात निष्कासनाची कारवाई पूर्ण करून हा बार पूर्ण भुईसपाट केला.
पश्चिम डोंबिवलीतील '7/ह' प्रभागात सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी आई गावदेवी ढाबा, दर्या किनारा ढाबा, साईकृपा ढाबा, जय मल्हार ढाबा, तारांगण ढाबा, हिरवाई ढाबा, चूल ढाबा, आई एकवीरा ढाबा, मया ढाबा, तुळसा ढाबा व खांदेश ढाबा अशा 11 बेकायदा ढाब्यांवर निष्कासनाची धडक कारवाई केली.
ही कारवाई विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या सहकार्याने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि फेरीवाला हटाव पथकातील कर्मचार्यांच्या साह्याने, तसेच ठेकेदाराकडील यंत्रसामुग्रीच्या साह्याने करण्यात आली. '9/आय' प्रभागातही किशोर ठाकूर यांनी 'कशिश' आणि 'रंगीला बार अँड रेस्टॉरंट'वरील निष्कासनाची कारवाई पूर्ण केली असून या दोन्ही बारची बांधकाम भुईसपाट केली. '10/इ' प्रभागात सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी 'किंग ऑर्केस्ट्रा' बारवरील निष्कासनाची कारवाई पूर्ण करून सदर बार भुईसपाट केला. कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्यातही नंदप रोडला असलेल्या 3 ढाब्यांवर निष्कासनाची केली. तसेच शाळांच्या परिसरातील तंबाखू, गुटखा, इत्यादी सामानाची विक्री करणार्या 4 टपर्या जेसीबी व डंपरच्या साह्याने उचलण्यात आल्या.
'ब' प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी कोळवलीतील जेबी लाऊंज, खडकपाड्यातील फूड स्टॉल जमीनदोस्त केले. या व्यतिरिक्त शाळा आणि कॉलेज परिसरातील पानटपर्यांवर कारवाई केली. अशीच कारवाई 'ड' प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी केली.