Crime News Pudhari News Network
ठाणे

Thane Crime Update | रंगाचा फुगा का फेकला? शिवीगाळ, मारहाण त्यानंतर थेट भोसकलेच

मानपाडा पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंंबिवली : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडला असलेल्या सांगावात होळी खेळताना रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली. यशवंत काॅम्पलेक्स भागात गुरुवारी (दि.13) रात्री साडेआठच्या सुमारास सोसायटी आणि परिसरातील मुले रंगीत पाण्याने भरलेले फुगे एकमेकांवर फेकून होळीचा आनंद घेत होती. रंगाचे फुगे एकमेकांवर फेकले जात असताना एक फुगा तेथेच उभ्या असलेल्या तरूणाच्या अंगावर पडला. त्यामुळे संतप्त झालेल्या एका तरूणाने फुगा फेकणाऱ्या अल्पवयीन तरूणाला जाब विचारत मारहाण तर केलीच, शिवाय अंधारात नेऊन त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला.

हल्ल्यात हर्ष शिवाजी कांबळे (१७) हा जखमी झाला असून त्याच्या जबानीवरून मानपाडा पोलिसांनी हल्लेखोर प्रणय जाधव (रा. यशवंत कॉम्प्लेक्स, सांगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हर्ष कांबळे हा मानपाडा रोडला असलेल्या शंकेश्वर शाळेजवळील साई विधी सोसायटीत कुटुंबासह राहतो. तर हल्लेखोर प्रणय जाधव हा तेथेच असलेल्या यशवंत काॅम्पलेक्समध्ये राहतो.

माझ्यावर रंगाचा फुगा का फेकला? डोंबिवलीत होळी खेळताना रंगाचा बेरंग

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री साडेआठच्या सुमारास यशवंत काॅम्पलेक्स परिसरात होळी पौर्णिमेनिमित्त हर्ष आणि त्याचे मित्र रंगाचे फुगे एकमेकांवर फेकून होळीचा आनंद घेत मौजमजा करत होते. त्यावेळी यशवंत काॅम्पलेक्समधील प्रणय हा मौजमजेत सहभागी न होता तो दूरवर उभा होता. रंगाचे फुगे एकमेकांंवर फेकत असतानाच त्यातील एक फुगा हर्षकडून चुकून प्रणयच्या अंगावर जाऊन पडला. त्यामुळे प्रणय भडकला. तू माझ्यावर रंगाचा फुगा का फेकला, असा जाब विचारत प्रणय याने हर्षला शिवीगाळ करत ठोसा-बुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर टी-शर्ट पकडून त्याला शंकेश्वर शाळेजवळील अंधार असलेल्या कोपऱ्यात जबरदस्तीने खेचत नेले. तेथे हर्षच्या हाताच्या दंडावर धारदार हत्याराने वार केले. हर्ष जखमी झाल्याचे पाहताच हल्लेखोर प्रणय जाधव याने तेथून पळ काढला.

परिसरात तणावाचे वातावरण

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत हर्षला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डाव्या हाताच्या दंडाला मोठी जखम झाली आहे. पोलिसांनी हर्षची जबानी नोंदवून गुन्हा दाखल केल्यानंतर फरार हल्लेखोर प्रणय जाधव याला हुडकून काढण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत यांनी तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT