डोंबिवली : बजरंग वाळुंज
कल्याण परिमंडळ 3 मध्ये पोलिस उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून अतुल झेंडे यांनी नशिल्या पदार्थांची रसद तोडून भल्या भल्या तस्करांसह गुंड-गुन्हेगारांना तुरूंगाचा रस्ता दाखवला आहे. नशामुक्तीची हाक देणाऱ्या डीसीपी झेंडे यांनी अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांसाठी आता आगळेवेगळे अभियान सुरू केले आहे. त्याची सुरूवात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून करण्यात आली असून आतापर्यंत १५ नाशेखोरांना व्यसनमुक्ती केंद्राकडे पाठविण्यात आले.
कल्याण पश्चिमेकडे स्टेशन परिसरात असलेल्या छोट्या-मोठ्या गल्ली-बोळांत, सार्वजनिक ठिकाणी आडोशाला, सुलभ शौचालयांमागे, सरकारी पडीक इमारतींच्या आश्रयाला अनेक नशेखोरांचे बस्तान असते. हेच नशेखोर त्यांना हव्या असलेल्या नशिल्या पदार्थांसाठी चोऱ्यामाऱ्या करत असतात. अशा नशेखोरांना समाजात कोणतेही स्थान नसते. माणूस म्हणून त्यांनाही जगण्याचा, समाजात राहण्याचा अधिकार आहे. अशांना नशेपासूनमुक्त करण्यासाठी डीसीपी अतुल झेंडे यांनी नशामुक्तीचे आगळेवेगळे अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपनिरीक्षक विकास मडके, उपनिरीक्षक जानुसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली हवा. काशिनाथ जाधव, मनोहर चित्ते, अजय पाटील, महेंद्र मंझा, आनंद कांगरे, किशोर सूर्यवंशी आणि दीपक थोरात या पथकाने १५ जानेवारीपासून आतापर्यंत १५ नशेखोरांना पकडून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले आहे. हे नशेखोर नशामुक्त होतील, वाममार्ग सोडतील, काम-धंदा करतील आणि उर्वरित आयुष्य उत्तमोत्तम जगतील असा पोलिसांना विश्वास वाटतो.
रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनेक नशा केलेले व्यसनाधीन इसम फिरत असतात. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा नशेखोरांचे नातेवाईक मिळून येत नाहीत. सतत नशेत असलेल्यांच्या हातून एखादा गंभीर गुन्हा घडण्याची दाट शक्यता असते. व्यसन सुटण्याकरिता नशेखोरांना ताब्यात घेऊन टिटवाळ्या जवळच्या गोवेली येथील दिशा सामाजिक सेवा संस्था या व्यसनमुक्ती केंद्रात पोलिसांचे खास पथक उपचारासाठी दाखल करत असते. अशा इसमांना प्रथमत: त्यांचे औषधोपचारांच्या साह्याने डिटॉक्सिफिकेशन केले जाते. काहींना मानसिक उपचार देण्याचीही गरज असते. त्याप्रमाणे मानस उपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु केले जातात.
त्यांना संस्थेच्या प्रोसेसमध्ये समाविष्ट केले जाते. त्यांच्याकडून रोज नियमित व्यायाम आणि योगा करवून घेतला जातो. त्यांचे समुपदेशनही केले जाते. मन प्रफुल्लीत करण्यासाठी त्यांना कॅरम, लुडो यांसारखे गेम्स खेळायला दिले जातात. धार्मिक पुस्तकेही वाचावयास दिली जातात. त्यांचे आयुष्य सकारात्मक व्हावे, यासाठी संस्थेकडून सर्व प्रयत्न केले जातात. उपचार पूर्ण झाल्यावर अशा इसमांना पुनर्वसनासाठी ते करू शकतील अशी कामे दिली जातात, जेणेकरून भविष्यात त्यांना चोरी किंवा इतर दुष्कृत्य न करता वा सहज मिळणारा पैसा यापेक्षा स्वतःच्या कष्टाने पैसे कमवून जीवन जगता यावे, यावर भर दिला जातो. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यांना शेतीची व इतर कामे दिली जातात. त्यांच्या जेवणासह राहण्याची सोय या कालावधीत विनामूल्य केली जाते.