Thane crime rate Pudhari
ठाणे

Thane Crime Rate: ठाण्यात सात महिन्यांत ४९ हत्या; ८४ हत्येचे प्रयत्न

गंभीर गुन्ह्यांचा ठाणे पोलिसांकडून शतप्रतिशत तपास

पुढारी वृत्तसेवा

सुरेश साळवे

ठाणे: ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत हत्या आणि हत्येच्या प्रयत्नासारख्या गुन्ह्यांचा वाढता आलेख दिसून येत असून याबाबतचा जुजबी तपास पाहता कायदा, सुव्‍यवस्थेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

येथील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे चित्र आकडेवारीवरून स्पष्‍ट होत आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, फसवणूक, ऑनलाईन गंडा अशा विविध गुन्ह्यांची भरमसाट साखळी निर्माण झाली असतानाच अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांच्या नोंदीत यंदा वाढ झाली आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्‍ये जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत ४९ हत्येचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, खुनी हल्ला आदी गंभीर स्वरूपाच्या तब्बल ८४ घटना पोलिसांच्या दप्तरी नोंद झाल्या आहेत.

येथील गंभीर गुन्ह्यांची संख्या चिंताजनक असली, तरी या प्रकरणांचा शतप्रतिशत तपास पूर्ण करून आरोपींवर कारवाई करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.

ठाणे आयुक्तालयाच्या पाच परिमंडळांमध्ये ३५ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. विविध पोलीस ठाणे हद्दीतील घटना पाहता हत्या, हत्येचे प्रयत्न, आणि घटनांमागील संपत्तीचे वाद, कौटुंबिक कलह, दोन गटांतील वर्चस्व स्पर्धा, प्रेमप्रकरणे तसेच अन्य वैयक्तिक कारणे या तपासात समोर आली आहेत.

जुलैमध्ये सर्वाधिक ११ हत्या

२०२६ मधील पहिल्या सात महिन्यांतील आकडेवारीनुसार मार्च आणि मे महिन्यात प्रत्येकी ९ हत्येचे गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, जुलैमध्ये हा आकडा वाढून ११ वर पोहोचला. त्यामुळे हत्येच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याचे पोलिसांसमोर आव्हान कायम आहे. तर दुसरीकडे, हत्येच्या प्रयत्नांच्या घटनांमध्ये महिन्यानुसार चढ-उतार दिसून येत आहेत.

जून २०२६ मध्ये सर्वाधिक २२ हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे नोंदविण्यात आले. या सर्व गंभीर प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे.

तपासाची गती वाढवून आरोपींवर कारवाई

हत्या आणि हत्येचा प्रयत्न हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने ठाणे पोलिसांकडून त्यांचा तपास प्राधान्याने करण्यात येत आहे. गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक करण्यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता वाढविण्यात आली आहे.

गंभीर गुन्ह्यांची नोंद होत असली, तरी प्रत्येक प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यात येत असल्याने ठाणे पोलिसांची कारवाईची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT