उल्हासनगर : गरब्याच्या कार्यक्रमात सराईत गुंडाने दहशत माजवण्यासाठी शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखत हवेत गोळीबार केल्याची घटना घडली.
उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्र मंडळाचा गरबा आहे. ह्या गरब्याचे आयोजन शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांनी केले आहे. त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी रात्री पावणे बारा वाजता अडवले. गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का, मी इकडचा भाई आहे, असे म्हणत सोहमने बंदूक काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखली. त्यामुळे गरब्यात एकच खळबळ उडाली. बाळा यांच्या भावाने मध्यस्थी करीत त्यांना वाचवले.
मात्र, चिडलेल्या सोहमने दहशत माजवण्यासाठी हवेत गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस पथकासह घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोहम पवार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत.