नेहरू रोडवरील पंजाबी भाई जुगार अड्ड्यावरून पोलीस पथकाने अड्डा चालविणाऱ्या महिलेसह एका जुगार खेळणाऱ्याला अटक केली आहे. (छाया : बजरंग वाळुंज)
ठाणे

Thane Crime | डोंबिवलीतील पंजाबी भाईचा जुगार अड्डा उद्ध्वस्त

पुढारी इम्पॅक्ट : रामनगर पोलिसांकडून दोघांची धरपकड; धाडीदरम्यान रोख रकमेसह जुगाराचे साहित्य हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पूर्वेकडील डोंबिवली ते ठाकुर्ली स्टेशनच्या समांतर नेहरू रोडला पंजाबी भाईचा जुगार अड्डा या नावाने पोलिसांना खुले आव्हान देत काही बदमाशांनी जुगाराचा अड्डा थाटल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

सर्वाधिक वर्दळीच्या नेहरू रोडला असलेल्या शिधापत्रिका कार्यालयाजवळ सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या कोपऱ्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून हा जुगाराचा अड्डा बिनबोभाट सुरू असल्याचे सचित्र वृत्त दैनिक पुढारीने गुरूवारी 13 फेब्रुवारीच्या अंकात प्रसारित केले होते. सदर वृत्ताची रामनगर पोलिसांनी गंभीर दखल घेऊन शुक्रवारी (दि.14) रोजी सकाळी सव्वानऊ वाजता या अड्ड्यावर अचानक धाड टाकली. या धाडीत दोघेजण रंगेहाथ पकडण्यात आले. या दुकलीकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

अनिता बबलू सिंग (40) आणि राहूल भीमराव बनसोडे (30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही कल्याण रोडला आजूबाजूला असलेल्या त्रिमूर्तीनगर आणि इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारे आहेत.

नेहरू रोडला असलेल्या शिधापत्रिका कार्यालय आणि स्वच्छतागृहाच्या मोकळ्या जागेत गेल्या काही महिन्यांपासून जुगाराचा अड्डा बिनबोभाट सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. पंजाबी भाईचा जुगार अड्डा म्हणून हा अड्डा कुप्रसिध्द होता. परिसरातील रहिवासी, पादचारी, बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या गृहिणी, वयस्कर मंडळी या जुगार अड्ड्यामुळे त्रस्त होते. दैनिक पुढारीने "डोंबिवलीतील पंजाबी भाईचे पोलिसांना खुले आव्हान" या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसारित करताच रामनगर पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (दि.14) सकाळी या अड्ड्यावर अचानक धाड टाकून दोन जणांना अटक केली. या दोघांच्या विरोधात पोलिस हवालदार निलेश पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याचे कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीतील पंजाबी भाईंचे पोलिसांना खुले आव्हान या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेले वृत्त

गेल्या काही महिन्यांपासून बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर जुगार अड्डा चालविला जात होता. झटपट पैसे मिळत असल्याने डोंबिवली परिसरातील जुगाऱ्यांच्या या अड्ड्यावर दिवस उजाडल्यापासून जुगार खेळणाऱ्यांच्या उड्या पडलेल्या असायच्या. जुगार खेळण्यासाठी येणाऱ्यांमध्ये गांजाडू, चरसी, दारूडे, गर्दुल्ल्यांचाही सहभाग आहे. अनेकदा तर या अड्ड्यावर पैशांवरून आरडाओरडा, वादावादी, वेळप्रसंगी आपसात हाणामाऱ्या होत असत.

जुगार खेळवणाऱ्या महिलेसह एक अटकेत

दैनिक पुढारीमध्ये पंजाबी भाई जुगार अड्ड्याचे वृत्त प्रसिध्द होताच रामनगर पोलिसांनी या अड्ड्यावर पाळत ठेवली होती. शुक्रवारी (दि.14) सकाळपासून नेहमीप्रमाणे जुगारी या अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी जमा झाले असताना अचानक पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकून जुगार खेळवणारी अनिता सिंग आणि जुगार खेळणारा राहूल बनसोडे या दोघांना रोख रक्कम आणि जुगार खेळण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह अटक केली. या अड्ड्यावर सोरट नावाचा सट्टा खेळला जात असल्याचे तपासात उघड झाले. सोरट हे झटपट पैसे मिळण्याचे जुगारातील साधन मानले जाते.

पोलिसांनी अड्ड्यावर अचानक धाड टाकल्याने जुगाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र साखळी केलेल्या पोलिसांनी त्यांना जागीच रोखले. या जुगार अड्ड्यावर पोलिसांना आठशे रूपयांच्या चलनी नोटा, फ्लेक्स चार्ट, विविध वस्तू, प्राणी, पक्षी, वनस्पती, वस्तूंची चित्रे, बंद चिठ्ठ्या, ओरिजन पप्पू प्लेईंग पिक्चर्स लिहिलेले साहित्य आढळून आले. अनिता सिंग ही महिला सदर जुगार अड्डा चालवित असल्याचे आणि तेथे राहूल बनसोडे हा जुगार खेळत असल्याचे तपासात उघड झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि पंकज भालेराव, सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर कोकरे, हवालदार निलेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT