जादूटोणा
जादूटोणा file photo
ठाणे

Thane Crime News | जमिनी हडपण्यासाठी केला जादूटोणा

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : जिल्ह्यातील बहुंताश ग्रामीण पट्ट्यात गाव-पाड्या-वस्त्यांमध्ये अंधश्रद्धा आजही ठासून भरल्याचे दिसून येते. आता तर शहरी भागाला जोडलेल्या कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागात अजब प्रकार पहायला मिळत आहे. डोंबिवलीला जोडलेल्या एका गावात तेथील जागा-जमिनी हडपण्यासाठी आता जादूटोण्याचा अवलंब केला जात असल्याचे झाडाला बांधलेल्या उतार्‍यावरून दिसून येते. मनगटातील जोर संपल्यानंतर बिल्डर आणि त्यांच्या हस्तकांनी दहशतीचे वातावरण पसरविण्यासाठी आता याच शेतकर्‍यांवर उतार्‍याच्या माध्यमातून भुताटकी सोडल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

या संदर्भात शेतकर्‍यांपैकी सुशिक्षित तरूणाने हा प्रकार समाज माध्यमांद्वारे चव्हाट्यावर आणला आहे. सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीला जोडून कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या सोनारपाडा गावात आजही अनेक शेतकरी शेती करून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून उदरनिर्वाह करत आहेत. गाव-खेड्यांतही काँक्रिटचे जंगल पसरू लागल्याने या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीवर बिल्डरांची वक्रदृष्टी फिरली आहे. कुळ कब्जेवहिवाटीत कसत असलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी मौजे दावडी गावठाण हद्दीत आहेत. या मिळकतींचा ताबा शेतकर्‍यांकडून मिळवण्यासाठी बिल्डरांनी दलाल मंडळींना हाताशी धरून प्रयत्न केला जात आहे. जमिनी हडपण्यासाठी कधी गुंडागिरीच्या जोरावर, कधी भूमी अभिलेख, महसूल खात्याचा, तर कधी पोलिस बळाचा वापर करून आजपर्यंत प्रयत्न केले. तथापी या शेतकर्‍यांनी कशालाही भिक घातली नाही. संविधानाने दिलेल्या लोकशाही मार्गाने आजपर्यंत महसूल विभाग व भूमि अभिलेख यांच्या विरोधात आंदोलने केली. शेती वाचवण्यासाठी न्यायालयाच्या मार्गाने देखिल हे शेतकरी लढाई लढत आहेत.

शासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी

या प्रकारामुळे भयभीत झालेल्या शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र तरीही या भागातील शेतकरी अशा भंपक प्रकारांना भीक घालणार नाहीत. तथापी संबंधित अज्ञातांना अद्दल घडवण्यासाठी शासनाने आतातरी दखल घ्यावी. पोलिस प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी. महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासह त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोनारपाड्यातील शेतकरी वर्गाने केली आहे.

SCROLL FOR NEXT