ठाणे; पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबईतील दिघा येथे राहणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीला इंजेक्शन दिल्यानंतर तिचा काही वेळेतच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दिघा येथील पंढरीनगरात राहणारे उमेश सखाराम सोनवणे (४३) यांची मुलगी प्रेरणा (१३) हिला १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी अचानक ताप भरून आल्याने तिला याच परिसरात असलेल्या दवाखान्यात नेले होते. यावेळी डॉक्टरांनी प्रेरणाला एक इंजेक्शन दिले व घरी जाऊन आराम करण्यास सांगितले. त्यानंतर प्रेरणा घरी आली व तिने आपल्या वडिलांना मला खूप थंडी वाजत असल्याचे सांगितले. प्रेरणाच्या वडिलांनी तिला मी तुझ्यासाठी दूध गरम करतो तो पर्यंत तू आराम कर असे सांगितले. काही वेळेतच दूध गरम झाल्यानंतर
प्रेरणाच्या वडिलांनी तिला गोळी घेण्यासाठी उठवले असता तिची जीभ दातात अडकली होती व ती काही एक हालचाल करीत नव्हती. तिला त्वरित पुन्हा डॉक्टरकडे नेले असता या डॉक्टरांनी तीस कळवा हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. प्रेरणाला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू असतांना तिचा रात्री १०.४० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी प्रेरणाच्या वडिलांनी रबाळे पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.