डोंबिवली : बहिणीवर वाईट नजर ठेवतो, तिच्याकडे आशाळभूत नजरेतून पाहतो, हे समजल्यानंतर संतापाचा कडेलोट झालेल्या भावाने सावत्र बापाचा खात्मा करून टाकला. या घटनेनंतर टिटवाळ्या जवळच्या बल्याणी परिसरात एकच खळबळ माजली आहे. कादिर सिद्दीकी याला धारधार शस्त्रांनी ठार मारणाऱ्या कबीर सिद्दीकी आणि या हत्येसाठी मदत करणारा त्याचा मित्र अल्ताफ शेख अशा दोघांना कल्याण तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी हा गुन्हा अवघ्या बारा तासांच्या आत उघडीस आणला आहे. कबीर सिद्दीकी आणि त्याचा साथीदार अल्ताफ शेख या दोघांना कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टान अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कादिर सिद्दीकी याची रविवारी रात्री निघृणपणे हत्या करण्यात आली. कादिर याने काही वर्षांपूर्वी वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी लग्न केले होते. त्या महिलेस पहिल्या पतीपासून एक मुलगा आणि मुलगी असे अपत्य आहे. या मुलीवर कादिरची वाईट नजर पडली होती. आपल्या बहिणीच्या अनुला धोका निर्माण होण्याची कबीरला भीती वाटत होती. बल्याणी गावातील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या कादिरची रविवारी रात्री हत्या झाल्यानंतर तो राहत असलेल्या परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती कळताच टिटवाळ्याच्या तालुका पोलिसांनी तपासचक्रांना वेग दिला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश यांच्या मार्गदर्शनाखाली कदम पोलिसांच्या खास पथकाने १२ तासांच्या आत कादिरच्या खुन्यांना हुडकून काढले. पोलिसांनी कौशल्य पणाला लावून खुनाचा गुन्हा अवघ्या बारा तासांच्या आत उघडकीस आणून कबीर आणि अल्ताफ या दोघांना बेड्या ठोकून गजाआड केले. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
कादिर सिद्दीकी याची हत्या त्याच्या सावत्र मुलगा कबीर याने केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले. या हत्येमध्ये कबीरचा मित्र अल्ताफ शेख हा देखील सहभागी होता. कादिरची वाईट नजर आपल्या बहिणीवर असल्याचा कबीरला संशय होता. तेव्हापासून कबीरचा कादिरवर राग होता. या रागातूनच त्याचा काटा काढायचे कबीरने ठरवले होते. रविवारी रात्री संधी मिळताच कबीरने त्याचा मित्र अल्ताफ शेख याच्या मदतीने कादिरला धारदार शस्त्राने संपवून टाकले.